आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 Percent Work Completes Within Two And Half Years

अडीच वर्षांत अवघे १५ टक्के काम पूर्ण, महापालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेने नगरोत्थान अभियानांतर्गत हाती घेतलेल्या सत्यम हॉटेल ते भुतकरवाडी पंपिंग स्टेशन रस्त्याचे काम गेल्या अडीच वर्षांपासून रखडले आहे. रस्त्याच्या कामासाठी तब्बल साडेचार कोटींचा निधी मंजूर आहे. ठेकेदार संस्थेच्या मनमानीमुळे आतापर्यंत रस्त्याचे केवळ १५ टक्के काम पूर्ण झाले आहे. बालिकाश्रम, कोठी, केडगाव देवी या रस्त्यांची कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. मात्र, भुतकरवाडी पंपिंग स्टेशन रस्त्याच्या कामाकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

राज्य शासनाने सुमारे ५५ कोटी रुपये खर्चाच्या शहरातील प्रमुख सात रस्त्यांच्या कामाला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत चार वर्षांपूर्वीच मंजुरी दिली. त्यात बालिकाश्रम, कोठी, केडगाव देवी, मुकुंदनगरमधील दर्गा दायरा, संजोगनगर, तसेच सत्यम हॉटेल ते भुतकरवाडी पंपिंग स्टेशन रस्त्याचा समावेश आहे. सातपैकी पाच रस्त्यांचे काम सध्या पूर्णत्वाकडे आहे. भुतकरवाडी रस्त्याचे काम मात्र मागील अडीच वर्षांपासून ठप्प आहे. या अडीच किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. बेस्ट कन्स्ट्रक्शन या ठेकेदार संस्थेला जानेवारी २०१३ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आला. काम पूर्ण करण्यासाठी एका वर्षाची मुदत होती, परंतु अडीच वर्ष उलटले तरी रस्त्याचे अवघे १५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामासाठी आणखी वर्ष लागण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या कामाचे लाइनआऊट झाले असून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाजवळील अतिक्रमणांमुळे काम आहे.

अडीच किलोमीटर रस्त्याचे काम अडीच वर्षे प्रतीक्षा करूनही पूर्ण होत नसल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. या परिसरात नागरी वसाहतींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नागरिकांच्या दृष्टीने हा रस्ता पूर्ण होणे आवश्यक आहे. परंतु ठेकेदार संस्थेची मनमानी मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. नगरोत्थान अभियानांतर्गत हाती घेतलेल्या बालिकाश्रम, कोठी, केडगाव देवी या रस्त्यांचे काम सध्या पूर्णत्वाकडे आहे. भुतकरवाडी रस्त्याचे कामही याच रस्त्यांबरोबर सुरू झाले होते. इतर रस्ते पूर्ण होऊ शकतात, मग भुतकरवाडी रस्त्याचेच काम का रखडले, असा सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत.

भुतकरवाडी पंपिंग स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे.

ठेकेदाराला मनपाचे अभय
भुतकरवाडीपंपिंग स्टेशन रस्त्यावर खोदकाम करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. दुसरीकडे काम सुरू नसल्याने ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी स्थिती आहे. बारचार्टप्रमाणे कामे झाली नाहीत, तर संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे मनपाच्या बांधकाम विभागाने वेळोवेळी सांगितले. परंतु सर्वच रस्त्यांच्या कामाची मुदत संपली, तरी एकाही ठेकेदार संस्थेवर दंडात्मक कारवाई झालेली नाही.

महापौरांनी लक्ष घालावे
सत्यम हॉटेल ते भुतकरवाडी पंपिंग स्टेशनपर्यंतचा रस्ता पूर्ण होणे ही या भागातील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी आहे. मात्र, मनपा पदाधिकारी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हे काम अडीच वर्षांपासून रखडले आहे. पावसाळ्यात रस्त्यावरून पायी चालणे देखील कठिण आहे. या रस्त्याच्या कामास गती देण्यासाठी महापौरांनीच लक्ष घालणे गरजेचे आहे. अनिल बोरूडे, नगरसेवक.