आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संचलनासह 177 जवानांचे शपथ ग्रहण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-नगरच्या मेकॅनाईज्ड रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी) मधील 177 जवानांनी शनिवारी शानदार संचलन करत देशनिष्ठेची शपथ घेतली. ‘एमआयआरसी’ची ही 380 वी तुकडी होती. या नंतर हे जवान आता विशिष्ट प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहेत. या संचलनाची मुख्य सलामी एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर जॉयदीप भाटी यांनी स्वीकारली. ते म्हणाले, की देशाच्या मान, सन्मानाचे रक्षण करण्याची जबाबदारी जवानांच्या खांद्यावर आहे. देशाचे रक्षण करणे, जवानाचे परमकर्तव्य आहे. जवानांच्या शिस्त व वर्तनावर रेजिमेंटची शान अवलंबून असते. त्यासाठी वेळ पडल्यास जवान आपल्या प्राणांचीही पर्वा करीत नाहीत, असा भारतीय सैन्याचा गौरवशाली इतिहास आहे. आज येथे शपथ घेणारे जवानही तो कायम ठेवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्या देशाला फक्त सीमेबाहेरच्या शत्रूंपासूनच फक्त धोका नाही, तर काही अंतर्गत फुटीर शक्ती देशाला धोका निर्माण करीत आहेत. जवानांना सर्व शक्तिनिशी त्यांचा मुकाबला करावा लागणार आहे. त्याच बरोबर नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही लोकांना मदतीची महत्त्वाची जबाबदारी पेलावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला पाठवले जाईल, तेथेही तुम्हाला सैन्य धर्माचे पालन करावे लागणार आहे, असे त्यांनी नमूद केले. एमआयआरसीचे बोधवाक्य असलेले वीरता व विश्वास म्हणजे नेमके काय, हे स्पष्ट केले.
एमआयआरसीतील अखौरा ड्रिल स्क्वेअर मैदानात सकाळी जवानांनी सादर केलेल्या शानदार संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. या संचलनाचे नेतृत्व रिक्रुट धरमेंदर याने केले. या संचलनात लष्कराच्या साध्या व बॅगपायपरच्या बँडनी सहभाग घेतला.प्रथम कर्नल एम. एस. सचदेव, नंतर प्रभारी उपकमांडंट कर्नल अमित झा व मुख्य सलामी ब्रिगेडिअर भाटी यांनी सलामी स्वीकारली. सलामी दिल्यानंतर उघड्या जीपमधून भाटी यांनी संचलनाचे निरीक्षण केले. परेड अँड्ज्युटंट मेजर अनिल कुमार यांनी संचलनाची सूत्रे स्वीकारली. त्यांनी आवाहन केल्यानंतर राष्ट्रीय ध्वज घेतलेल्या तुकडीचे मैदानात आगमन झाले. त्यावेळी राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली. सर्व उपस्थितांनी उभे राहून ध्वजाला सलामी दिली. त्यानंतर हिंदू, शीख, मुस्लिम व ख्रिस्ती धर्मगुरुंचे मैदानात आगमन झाले. त्यांच्याकडील धर्मग्रंथांवर हात ठेवून जवानांनी देशरक्षणाची शपथ घेतली.
त्यानंतर मेजर अनिलकुमार यांनी जवानांना देशनिष्ठेची शपथ देवविली. त्यानंतर सर्व जवानांनी बँडपथकासह संचलन करीत सलामी मंचासमोर जाऊन ब्रिगेडिअर भाटी यांना सलामी दिली. त्यानंतर प्रथम ध्वज तुकडी व नंतर जवानांनी मंचासमोर येऊन सॅल्युट करीत मैदान सोडले. या शानदार संचलनाबद्दल उपस्थित वरिष्ठ अधिकारी, निवृत्त अधिकारी व जवानांच्या कुटुंबीयांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले.
राकेश कुमार याला सुवर्णपदक प्रदान
शनिवारच्या संचलनात प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरीबद्दल बिगेडिअर भाटी यांनी राकेश कुमार याला जनरल सुंदरजी सुवर्णपदक, धरमेंदर याला जनरल सुंदरजी रौप्य पदक, तर आशिष पन्वरसिंह याला जनरल सुंदरजी कांस्य पदक प्रदान केले.