आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर शहरात होणार १८ नवीन वाहनतळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरातील वाहनतळांचा (पार्किंग) प्रश्न सोडवण्याची कार्यवाही महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. वाहनतळासाठी आरक्षित असलेल्या विविध भागांतील १८ जागा विकसित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. वाहनतळासाठी आरक्षित असलेल्या जागामालकांनी स्वत: जागा विकसित करावी; अथवा दुप्पट हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) घेऊन ही जागा महापालिकेला द्यावी, असा हा प्रस्ताव आहे. येत्या काही दिवसांत ही कार्यवाही पूर्ण होणार असल्याची माहिती आयुक्त विलास ढगे यांनी सोमवारी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.
शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. वाहने उभी करण्यासाठी पार्किंगची सुविधा नाही, हे त्यातील एक प्रमुख कारण आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत. आता मात्र मनपा प्रशासनाने हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शहराच्या विविध भागांत वाहनतळांसाठी आरक्षित असलेल्या जागा विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आठवडाभरात या जागामालकांशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. वाहनतळ उभारण्यासाठी मनपा प्रशासनाने आरक्षित असलेल्या जागामालकांसमोर दोन पर्याय ठेवले आहेत. ज्या जागेवर वाहनतळाचे आरक्षण आहे, त्या जागेच्या मालकाने स्वत:च वाहनतळाची व्यवस्था करून ते चालवावे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर जागामालकाचाच हक्क राहणार आहे. हा पर्याय मान्य नसेल, तर जागामालकाने दुप्पट हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) घेऊन ती जागा महापालिकेकडे हस्तांतरित करावी, असे दोन पर्याय प्रशासनाने ठेवले आहेत. त्यामुळे वाहनतळांचा प्रश्न तर सुटणार आहे, शिवाय जागेवरील अारक्षणामुळे जागामालकांची सुरू असलेली डोकेदुखीही थांबेल. आरक्षण असल्यामुळे जागामालकांना या जागांची विक्री करता येत नव्हती. आता महापालिकाच या जागा दुप्पट टीडीआर देऊन हस्तांतरित करण्यास तयार आहे. त्यामुळे जागामालकांना चांगला मोबदला मिळेल. जागा मनपाकडे हस्तांतरित करायची नसल्यास वाहनतळ उभारून त्यातून मिळणारे उत्पन्न जागामालकांना मिळेल. प्रशासनाच्या या स्वागतार्ह प्रस्तावामुळे शहरातील वाहतळांचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. त्यातून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मोठा हातभार लागणार आहे.

चांगला प्रतिसाद मिळेल
^वाहनतळांची व्यवस्थाही नगर शहराची मोठी गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठीच आरक्षित जागांवर वाहनतळ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जागामालकांसमोर दोन पर्याय ठेवले आहेत. जागामालकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. जागामालकांशी पत्रव्यवहार करून कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.'' विलास ढगे, महापालिकाअायुक्त.

अनधिकृत पार्किंगमध्ये लूट
शहरातील काही भागात राजरोसपणे अनधिकृत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तेलीखुंटजवळील जुन्या सिव्हिल रुग्णालयाच्या जागेवर मागील काही वर्षांपासून अनधिकृत पार्किंग सुरू आहे. वाहनचालकांची अडवणूक करत त्यांच्याकडून जास्तीचे पैसे उकळण्याचा उद्योग राजरोसपणे होत आहे. मनपाने अधिकृत पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिल्यास अशा प्रकारांना आळा तर बसेलच, शिवाय वाहनचालकांसाठी हक्काची वाहनतळं उपलब्ध होतील.