आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नगर- आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, तर प्रचंड आत्मविश्वास हवा. जिद्द, चिकाटी, प्रयत्नांमधील सातत्य आणि आत्मविश्वास या गोष्टींच्या बळावरच यशाचे शिखर गाठता येते. यशाचे शिखर गाठण्यासाठी इतर कोणताही ‘शॉर्टकट’ नसतो, असे 19 वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार विजय झोल याने सांगितले.
येथील मराठवाडा मित्रमंडळाचा 28 वा वर्धापन दिन रविवारी साजरा झाला. हे औचित्य साधून मंडळाच्या वतीने मूळचा मराठवाड्यातील असलेल्या विजयला स्वामी रामानंद तीर्थ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार होते. महापौर शीला शिंदे, मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. सुधा कांकरिया, सरचिटणीस सदाशिव मोहिते, मुकुंद देवळालीकर, जयंत येलुलकर, प्रमोद कांबळे आदी या वेळी उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. प्रकाश कांकरिया यांनी केले. महापौरांच्या हस्ते विजयला सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. सन्मानपत्राचे वाचन रमेशचंद्र बाफना यांनी केले. महापौर शिंदे यांनी विजयच्या जिद्द व चिकाटीचे कौतुक केले. प्रयत्न करायला नकार दिला, तर ध्येय गाठणे अशक्य असते. त्यामुळे आपण स्वीकारलेल्या करिअरमध्ये सातत्याने प्रयत्न करीत राहणे, हाच यशस्वी होण्याचा मार्ग असतो, असे सांगून भारतीय संघात सहभागी होण्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना विजयने श्रोत्यांशी खुला संवाद साधला. लहानपणापासून क्रिकेटची आवड असल्याचे व पालकांनी खंबीर साथ दिल्याचे त्याने सांगितले. घरात, कॉलनीत व नंतर काणे सरांच्या अकादमीत मनमुराद क्रिकेट खेळलो. प्रचंड मेहनत घेतली, असे तो म्हणाला. 14 व 19 वर्षांखालील भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचा मान मिळाला ही अभिमानाची बाब आहे. आशिया चषक स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध मी शानदार शतक झळकावले, पण तो सामना एका धावेने गमावला हे शल्य अजूनही बोचते, असे तो म्हणाला. तुमचा फिटनेस महत्त्वाचा असतो. व्यायाम व योगासने आवश्यक असतात. खेळताना होणार्या चुकांमधून खूप शिकायला मिळते. संघाचे डॉक्टर व आहारतज्ज्ञांनी दिलेला सल्ला खूप मोलाचा असतो, असे त्याने सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.