आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: कर्जबाजारी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी,जामखेड - कर्जबाजारी पणामुळे जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. एक घटना नगर तालुक्यातील मेहेकरी गावात, तर दुसरी घटना जामखेड तालुक्यात घडली.

 

नगर तालुक्यातील मेहेकरी येथील सुभाष अप्पा बडे (४८ वर्षे) या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आली. मंगळवारी रात्री दहा ते बुधवारी पहाटे सातच्यादरम्यान त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. घरातील अँगलला दोर बांधून त्यानी गळफास घेतला.

 

बडे यांना ४-५ एकर शेती होती. थकीत कर्जामुळे मागील आठवड्यात त्यांना काही पतसंस्था बँकेच्या कर्जाबाबत नोटीस आल्याचे सांगण्यात येते. तेव्हापासून त्यांची मनस्थिती ठीक नव्हती. थकीत कर्जामुळेच त्यांनी आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यामागे दोन विवाहित मुली, अविवाहित मुलगी, पत्नी असा परिवार आहे. पोलीस नाईक अशोक मरकड पुढील तपास करत आहेत. दरम्यान, बडे यांच्या खिशात सावकारी कर्जाबाबत चिठ्ठी सापडल्याची चर्चा परिसरात होती, मात्र पोलिसांनी अशी कोणतीही चिठ्ठी सापडली नसल्याचे सांगितले.

 

जामखेड तालुक्यातील गोयकरवाडी येथील शेतकरी बाबासाहेब राऊ गोयकर (४८ वर्षे) यांनी गळफास घेऊन मंगळवारी रात्री आत्महत्या केली. त्यांच्यामागे वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. हा प्रकार सकाळी सहा वाजता निदर्शनास आला. स्वतच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत गोयकर आढळले. त्यांना अडीच एकर जमीन आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याबाबतची खबर पोलीस पाटील कांतिलाल वाळुंजकर यांनी दिल्यानंतर काॅंन्स्टेबल विठ्ठल चव्हाण यांनी पंचनामा केला.

बातम्या आणखी आहेत...