आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: राधाकृष्ण विखे पाटील यांनी दत्तक घेतली 208 शेतकरी कुटुंबे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील कुटुंबाच्या जनसेवा फाउंडेशनने अहमदनगर जिल्ह्यातील २०८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे दत्तक घेतली. मागील सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत उपाययोजना केल्या नाहीत. तेव्हाच्या सरकारने शेतकऱ्यांना गांभीर्याने घेतले नाही, तर आताच्या सरकारने वाऱ्यावर सोडले. त्यामुळे आधीच्या सरकारमधील मंत्र्यांनी अशी कुटुंबे दत्तक घेऊन प्रायश्चित्त घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. 
 
दत्तक कुटुंबातील पाल्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण, मुलींचा विवाह, आरोग्य सुविधा, अपघात विमा, एका व्यक्तीला शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी आणि महिलांना शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी अादी सुविधा मिळतील. नंदनवन लॉनमध्ये झालेल्या या कार्यक्रमात विखे बोलत होते. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे, प्रतिभा रघुवंशी, माजी खासदार दादा पाटील शेळके, संभाजी फाटके, सुजय विखे यांच्यासह आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित होते. 
 
विखे म्हणाले, संघर्ष यात्रेच्या माध्यमातून मी राज्यभर प्रवास केला. कर्जमाफीसह शेतीच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना झाल्या पाहिजेत. राजकीय भूमिकेतून या प्रश्नाकडे पाहणे गरजेचे आहे. तरच शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील. 
 
सरकारचे लक्ष केवळ स्मार्ट सिटीकडेच 
आधीच्या सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने घेतले नाहीत. आताच्या सरकारनेदेखील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. केवळ स्मार्ट सिटीकडेच या सरकारचे लक्ष आहे. केंद्र राज्य सरकार शेतकरी प्रश्नांवर गंभीर नाही. -राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस नेते 
बातम्या आणखी आहेत...