आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवावर यंदाही सीसीटीव्हीची नजर, अडीचशे ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरासह जिल्ह्यातील गणेशोत्सवावर यंदादेखील क्लोज सर्किट कॅमेऱ्यांची नजर आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी सुमारे २५० उच्च दर्जाचे कॅमेरे बसवण्याचे काम प्रगतिपथावर आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या पुढाकाराने ही संकल्पना राबवण्यात येत आहे.
 
विसर्जन मिरवणुकीसाठी स्क्रीनही लावण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलिसांना परिस्थितीनुसार नियोजन करणे सोपे जाईल. महत्त्वाचे म्हणजे गणेशोत्सवात, तसेच विसर्जन मिरवणुकीत गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध ठोस पुरावाच तयार होणार आहे. याशिवाय कडेकोट पोलिस बंदोबस्तही तैनात असणार आहे. 
 
शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक रामचंद्र खुंटावरून सुरू होऊन दिल्ली दरवाजा येथे संपते. मिरवणुकीत प्रमुख चौदा मंडळे सहभागी होतात. मिरवणूक मार्गावरील अनेक ठिकाणे संवेदनशील आहेत. त्यामुळे तेथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिस खबरदारी घेतात, तरीही मंडळ मिरवणूक पुढे नेण्यावरून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, लोकप्रतिनिधींमध्ये वाद होतात. ठरावीक चौकांमध्ये शक्तिप्रदर्शन केले जाते. त्यामुळे तणाव निर्माण होऊन पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण वाढतो. 

मिरवणुकीतील संवेदनशील ठिकाणी गेल्या वर्षीही सीसीटीव्ही बसवण्यात अाले होते. यंदाही हाच फंडा अवलंबण्यात आला आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये उच्च दर्जाची सीसीटीव्ही सेवा पुरवणाऱ्या आय टॅलेंट मीडिया फर्मला हे काम देण्यात आले आहे. रामचंद्र खुंट, आडते बाजार, तेलीखुंट, घासगल्ली, भिंगारवाला चौक, अर्बन बँक चौक, नवीपेठ चौक, नेता सुभाष चौक, मिरावली दर्गा, चौपाटी कारंजा असा मिरवणुकीचा मार्ग आहे. या सर्व मार्गावर ५५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून केलेले चित्रीकरण पाहण्यासाठी शहरात दहा ठिकाणी स्क्रीन लावण्यात येणार आहेत.
 
शिवाय पोलिसांची गस्तही सुरू आहे. गणेशोत्सवात, तसेच विसर्जन मिरवणुकीत छेडछाडविरोधी बॉम्बशोधक पथकही तैनात असेल. शहरातील दुकानदारांनी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचाही पोलिस उपयोग करून घेत आहेत. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीतील अनुचित प्रकारांवर पोलिसांना यंदा करडी नजर ठेवता येईल. भिंगारच्या विसर्जन मिरवणुकीवरही नजर ठेवण्यासाठी यंदा सीसीटीव्हीची मदत घेतली जाणार आहे. भिंगार पोलिसांच्या वाहनावर सीसीटीव्ही बसवण्यात आला आहे. 
 
संवेदनशील मिरवणुकांवर नजर 
जिल्ह्यातश्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव शहर, जामखेड, नेवासे, तर नगर शहरातील कोतवाली, तोफखाना, भिंगार येथील विसर्जन मिरवणुका संवेदनशील समजल्या जातात. या सर्व संवेदनशील मिरवणुकांच्या मार्गावर आतापर्यंत एकूण १६८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. विसर्जन मार्ग, विसर्जनाचे ठिकाण असलेल्या विहिरी, बारवा, तसेच हौद संवेदनशील चौकांत हे सीसीटीव्ही बसवले आहेत. याशिवाय घारगाव, कोपरगाव तालुका शिर्डीत मिळून १०० हून अधिक सीसीटीव्ही बसवले आहेत. 
 
स्वयंसेवकांचीही मदत 
गणेशोत्सव बकरी ईद एकाच वेळी आल्यामुळे यंदा प्रशासनावर अतिरिक्त बंदोबस्ताचा ताण आहे. पोलिसांना मदत करण्यासाठी होमगार्ड आहेत. शिवाय शहरातील महाविद्यालयांचे स्वयंसेवक स्वत:हून पुढे सरसावले आहेत. या महाविद्यालयीन स्वयंसेवक विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही नेहमीप्रमाणे कायदा सुव्यवस्थेचे पालन करून भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करावा. काही अनुचित प्रकार आढळला, तर तत्काळ पोलिसांशी संपर्क करावा. 
- रंजनकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक. 
 
बकरी ईदला कडेकोट बंदोबस्त 
जिल्ह्यातबकरी ईदसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त असेल. शहरात अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, १२ सहायक निरीक्षक उपनिरीक्षक, २०० पोलिस कर्मचारी, एसआरपी प्लाटून, आरसीपी प्लाटून २५ महिला पोलिस कर्मचारी असतील. हाच बंदोबस्त भिंगारच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत वापरला जाईल. या बंदोबस्तातील कर्मचाऱ्यांना दिवसभर बंदोबस्त असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्वांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. 
 
उच्च दर्जाचे चित्रीकरण 
गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचे सीसीटीव्हीच्या माध्यमातून चित्रीकरण करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. ही जबाबदारी आय टॅलेंट मीडिया या खासगी फर्मवर सोपवण्यात आली आहे. मंगल भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली व्रजेश गुजराथी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात सीसीटीव्ही बसवण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून उच्च दर्जाचे चित्रीकरण होत असल्याचे गुजराथी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...