आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेश अभ्यासदौरा हा शेतकऱ्यांसाठी पर्वणी, 267 शेतकऱ्यांची ड्राॅद्वारे निवड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी परदेशदौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून, हा दौरा शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणीच आहे. शेतकरी अभ्यासदौऱ्याचा शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावा. प्रत्येक शेतकऱ्याला परदेश दौऱ्यास जाण्याची इच्छा आहे. मात्र, मर्यादित लोकांचीच या दौऱ्यासाठी निवड करावयाची असल्याने सोडत पद्धतीने करण्यात आली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी केले. 
 
कृषी विभागाच्या वतीने आयोजित शेतकरी परदेशी दौऱ्यासाठीची सोडत जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तंत्रअधिकारी अशोक संसारे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे आदी उपस्थित होते. 
 
महाजन म्हणाले, शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. शासन स्तरावर प्रयत्न करीत असून, शेतकऱ्यांनीही नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपला शेतीविकास करावा, असे सांगितले. लोणारे म्हणाले, या परदेश दौऱ्यासाठी जिल्ह्यातून २६७ शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली. आलेल्या अर्जांपैकी ३३ शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. निवड झालेल्या २६७ शेतकऱ्यांची यादी विभागीय स्तरावर पाठवून देण्यात येणार आहे. इस्त्राईल, जर्मनी, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी नेण्यात येणार आहे. देशाच्या दौऱ्यानुसार शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येणार आहे. शासनाच्या निकषानुसार लकी ड्रॉ केला आहे. जसा शासनाचा निधी उपलब्ध होईल, तसे शेतकऱ्यांना अभ्यासदौऱ्यासाठी पाठवण्यात येणार आहे. या परदेश दौऱ्यासाठी शासन ५० टक्के मदत करणार असून, उर्वरित ५० टक्के शेतकरी स्वतः वाटा भरणार आहेत, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन अशोक संसारे यांनी केले. आभार बाळासाहेब नितनवरे यांनी मानले. 
 
कृषी विभागाच्या वतीने आयोजित शेतकरी परदेशी दौऱ्यासाठीची सोडत जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तंत्रअधिकारी अशोक संसारे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे आदी. 
बातम्या आणखी आहेत...