आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२८ दिवस उलटले; 'फेज टू'चा तिढा कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहर सुधारित पाणी योजनेचे (फेज टू) काम बंद होऊन तब्बल २८ दिवस उलटले. शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या योजनेचे काम पुन्हा सुरू व्हावे, यासाठी महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी अद्याप पाऊल उचलले नाही. विशेष म्हणजे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देणारे विरोधकही याप्रश्नी गप्पच आहेत. ठेकेदार संस्थेने तर पुन्हा काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे महत्त्वाकांक्षी फेज टू योजना कायमचीच बंद होण्याच्या मार्गावर आहे. योजनेवर आतापर्यंत झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्चही त्यामुळे वाया जाण्याची भीती आहे.

केंद्र शासनाच्या युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत हाती घेतलेल्या फेज टू योजनेचे काम गेल्या तीन आठवड्यांपासून बंद आहे. महापालिकेचे असहकार्य व नऊ कोटींची थकीत िबले मिळत नसल्याने ठेकेदार संस्था तापी प्रिस्टेजने हे काम थांबवले आहे. आमदार तथा महापौर संग्राम जगताप यांनी योजनेचे काम सुरूच असल्याचा दावा वेळोवेळी केला. आठ दिवसांत काम सुरू झाले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी दिला. मात्र, तीन आठवडे उलटले, तरी प्रशासन हातावर हात धरून बसले आहे. महापौर जगताप केवळ आश्वासनेच देत आहेत, तर विराेधकांना अद्याप आंदोलनाची दिशा ठरवता आलेली नाही. महापालिकेच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र नगरकरांचे मुबलक पाण्याचे अनेक वर्षांचे स्वप्न धुसर झाले आहे. सत्तांतर झाल्यानंतर योजनेच्या कामास गती मिळेल, अशी नगरकरांची अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली. योजनेच्या काही कामासाठी पुन्हा २० कोटींची निविदा मंजूर करण्याचा सत्ताधाऱ्यांनी घातला. जुन्या ठेकेदाराशी झालेल्या करारनाम्याचा भंग करून, तसेच शासनाची परवानगी न घेता ही निविदा मंजूर करण्यात आली. त्यात कोट्यवधींची टक्केवारी सत्ताधाऱ्यांनी लाटली असून या प्रकारामुळेच योजनेचे काम बंद झाल्याची चर्चा आहे. ठेकेदार संस्था काम करण्यास तयार झाली नाही, तर मनपाला दुसऱ्या ठेकेदार संस्थेसाठी शोधाशोध करावी लागणार आहे. परंतु अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी एखादी ठेकेदार संस्था तयार होईल, याबाबत शंकाच आहे. सध्यातरी सत्ताधाऱ्यांना योजनेचे काम पुन्हा सुरू करण्याची कोणतीच घाई दिसत नाही. महापौर जगताप सध्या शहराच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडून जिल्हा बँक निवडणूक व लहान-मोठ्या उदघाटनांच्या कार्यक्रमात मग्न आहेत. त्यामुळे फेज टूचे भवितव्य अधांतरीच आहे.

५६ कोटी वाया जाण्याची भीती
या योजनेच्या कामासाठी ठेकेदार संस्थेला आतापर्यंत ५६ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यातून शंभर िकलोमीटर अंतर्गत जलवाहिन्या, पाण्याच्या उंच टाक्या, तसेच जास्त क्षमतेच्या मशिनरी खरेदी करण्यात आली आहेत. परंतु आता ठेकेदार संस्थेने यापुढे काम करण्यास नकार दिल्याने आतापर्यंत झालेला हा खर्च वाया जाण्याची भीती आहे.

आज आंदोलनाची दिशा ठरवणार
आयुक्त दोन दिवसांपासून शहरात नव्हते. बुधवारी शिवसेना-भाजपचे सर्व नगरसेवक आयुक्तांना फेज टूच्या कामाबाबत जाब विचारणार आहेत. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास लगेच आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल. शहरासाठी फेज टू योजना महत्त्वाची आहे. योजनेचे बंद झालेले काम त्वरित सुरू होणे आवश्यक आहे.''
अनिल शिंदे, नगरसेवक.

पीएमसीने दिला काम करण्यास नकार
फेज टू योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन समिती (पीएमसी) म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण काम पाहत आहे. परंतु मनपाने या समितीचे २५ लाखांचे बिल थकवले आहे. जोपर्यंत हे थकीत बिल मिळत नाही, तोपर्यंत काम सुरू न करण्याचा निर्णय पीएमसीच्या कार्यकारी अभियंत्या सुनंदा नरवडे यांनी घेतला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे योजनेचे भवितव्य बिकट बनले आहे.