आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 30 Crore Turnover In Auragnabad On The Occasion Of Vijayadashmi

विजयादशमीला झाली तीस कोटींची उलाढाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- ‘दारी बांधता तोरण, घर नाचले नाचले. आज अंगणी आले सोनचाफ्याची पावले,’ अशा हर्षोल्हासात रविवारी शहरात विजयादशमीचा सण उत्साहात साजरा झाला. महागाई असली तरी खरेदीसाठी सर्वसामान्यांचा उत्साह जराही कमी झाला नसल्याचे चित्र बाजारपेठेत पहायला मिळाले. कापडबाजार, सराफबाजार, तसेच वाहनांची शोरूम ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेली होती. दसर्‍याच्या मुहूर्तावर नगरकरांनी खरेदीचा आनंद घेतला. दिवसभरात सुमारे तीस कोटींची आर्थिक उलाढाल झाली.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्‍याच्या सणाला नगरकरांनी सोन्या, चांदीच्या दागिन्यांबरोबरच कार, दुचाकी व सायकलखरेदीचा आनंद लुटला. या सणाला खरेदी करणे शुभ मानले जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा झालेल्या दमदार पावसामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण होते. सराफ बाजारात तीन कोटींची उलाढाल झाली. सोन्याच्या दुकानांत फॅन्सी दागिन्यांना जास्त मागणी होती. वाहनखरेदीत सुमारे दहा ते बारा कोटींची उलाढाल झाली. टाटा, ह्युंदाई, मारुती, फोर्ड कंपनीच्या 200 नवीन गाड्यांची विक्री झाली, तर दीड हजारांहून अधिक दुचाकींची विक्री झाली.

कार व दुचाकी सोबतच यंदा सायकलीलाही मोठी मागणी होती. शहरात सायकल विक्री करणारी प्रमुख आठ दुकाने आहेत. या दुकानांतून सुमारे 500 सायकलींची विक्री झाली. सायकलविक्रीतून सुमारे 20 लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. नगरच्या कापडबाजारातही यंदा चांगली उलाढाल झाली. रात्री उशिरापर्यंत दुकांनात गर्दी होती.

भावातील चढ-उतारामुळे खरेदीत घट
गेल्या वर्षी दसर्‍याच्या दिवशी सराफ बाजारात चांगली उलाढाल झाली होती. यंदा सोन्याच्या भावात चढ-उतार होत असल्यामुळे सोन्याची मागणी घटली आहे. दिवाळीत बाजार चांगला राहील, असा विश्वास सराफ असोसिएशनचे अध्यक्ष संतोष वर्मा यांनी व्यक्त केला.