नगर- नगर शहरासह जिल्ह्यात सोमवारी रात्री वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, खरिपाच्या पेरणीसाठी शेतकयांची लगबग सुरू झाली आहे. नगरसह पाथर्डी, राहुरी, कर्जत, श्रीगोंदे व जामखेड तालुक्यात वादळी वा-यासह पाऊस झाला. जिल्ह्यात 77 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे व अकोले या तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पावसाने नुकसान केले. बोल्हेगाव येथे पत्रे उडून अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू झाला. वादळामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने शहरासह उपनगरांत रात्री उशिरापर्यंत वीज नव्हती.
जोरदार पावसामुळे पिकांचे, विशेषत: फळबागांचे मोठे नुकसान झाले. सुमारे तीनशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या तीन दिवसांत या नुकसानीचा अहवाल येण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळेही जिल्ह्यात सुमारे 1 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकयांना शासनाने मदत जाहीर केली होती. जिल्ह्यातील बहुतांशी शेतक-यांच्या बँकखात्यात ही मदत जमा करण्यात आली आहे. दरम्यान, पेरण्यांसाठी हा पाऊस उपयुक्त असल्याने बियाणे व खते घेण्यासाठी शेतकरी गर्दी करू लागले आहेत.