आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईज्योती यात्रेत तब्बल ३२ लाखांची उलाढाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने आयोजित साईज्योती स्वयंसहायता बचत गटांच्या प्रदर्शनात पहिल्या दोन दिवसांत सुमारे ३२ लाखांची उलाढाल झाली. रविवारच्या सुटीमुळे सकाळपासूनच खरेदी करणाऱ्यांची प्रदर्शनात गर्दी झाली होती. खवय्यांनी शिपी आमटीवर ताव मारत खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयंसहायत बचत गटांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन सावेडीतील जॉगिंग ट्रक मैदानासमोर भरले आहे. प्रदर्शनाचे उद््घाटन शनिवारी (१७ जानेवारी) पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते झाले. पहिल्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत लोक प्रदर्शन पाहण्यासाठी येत होते. रविवारी सुटी असल्याने खरेदीसाठी झुंबड उडाली. खवय्यांनी कर्जतची शिपी आमटी, थालीपीठ, मांडे, पाणीपुरी, भेळ, पापड, वांग्याचे भरीत आणि बाजरीच्या भाकरीवर ताव मारला.

या प्रदर्शनात २९२ स्टॉल आहेत. त्यात २० व्यावसायिक स्टॉलचाही समावेश आहे. त्यामुळे मोठी स्पर्धा पहावयास मिळत आहे. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना रास्त दरात चांगल्या वस्तू उपलब्ध होत आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत बचत गटांची सुमारे ७ लाखांची उलाढाल झाली. रविवारी सायंकाळी साडेसातपर्यंत सुमारे २५ लाखांची उलाढाल झाली. प्रदर्शन २० जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री "झेप मराठी कलेची' या नाट्य व नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

या प्रदर्शनात "पुणेरी भेळ' नावाच्या एका व्यावसायिक स्टॉलवर पिण्यासाठी साधे पाणी मिळणार नाही, पाण्याची बाटली घ्यावी लागेल, असे सांगण्यात आले. भेळीचा आस्वाद घेतल्यानंतर काही ग्राहकांना बाहेर पाण्याच्या टाकीवर जाऊन पाणी पिण्याची वेळ आली. याप्रकरणी प्रकल्प संचालक प्रभाकर गावडे यांनी संबंधित स्टॉलची माहिती घेऊन तेथे पाण्याच्या बाटलीबरोबरच साधे पाणी उपलब्ध करण्याच्या सूचना स्टॉलचालकांस दिल्या.
ग्राहकांचा वाढता प्रतिसाद
-महिला बचत गटांच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनाला उद््घाटनापासूनच शहर व जिल्ह्यातील ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये हस्तकलेच्या वस्तूंना चांगली मागणी आहे. प्रदर्शनातील २० व्यावसायिक स्टॉल केवळ स्पर्धा वाढावी या हेतूने देण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचाही फायदा होत आहे.''
प्रभाकर गावडे, प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा.