आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात ३८ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यात सध्या टंचाई स्थिती नसल्याने उपलब्ध असलेला चारा पुरेशा प्रमाणात आहे. खरीप व रब्बीचा उर्वरित ३७ लाख ९३ हजार मेट्रिक टन चारा मार्चपर्यंत पुरणार आहे. त्यानंतर खऱ्या टंचाई परिस्थितीला सामोरे जावे लागणार असल्याने पशुसंवर्धन विभाग तसेच कृषी विभागाने चारा पिकाचे नियोजन केले आहे. या नियोजनावर जिल्हा परिषद सदस्य समाधानी नसून चारा खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
जिल्ह्यात २०१२ मध्ये झालेल्या पशुगणनेनुसार जनावरांची संख्या १३ लाख ३३ हजार ३७६, तर लहान जनावरांची संख्या २ लाख ८५ हजार ४२७ आहे. टंचाई कालावधीत मोठ्या जनावराला प्रतिदिन सहा किलो, तर लहान जनावरांना प्रतिदिन तीन किलो कोरडा चारा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्याबरोबरच सात ते पंधरा किलो हिरव्या चाऱ्याची गरज आहे. जिल्ह्यात ३१ ऑक्टोबरअखेर ३८२ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या ८२ टक्के आहे.
जिल्ह्यातील एकूण रान गवत, चारा ३७ लाख ९३ हजार ४०२ मेट्रिक टन असून हा चारा मार्च २०१५ पर्यंतच पुरणार आहे. जिल्ह्यात रब्बीची ज्वारी, मका, ऊस व वाढे यापासून मिळणारा चारा २२ लाख १८ हजार २०५ मेट्रिक टन उपलब्ध होणार आहे. तसेच टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने जिल्हा नियोजन समिती व आदिवासी उपाययोजनांतर्गत कामधेनू ग्रामदत्तक योजनेतून मका बियाण्यांचा व यशवंत, जयवंत गवताची ठोंबे लाभार्थींना पुरवठा केली आहे. या माध्यमातून ९६ हजार ७२० मेट्रिक टन चारा उपलब्ध होऊ शकतो, असा पशुसंवर्धन विभागाचा अंदाज आहे, पण संभाव्य टंचाईवरून सदस्य आक्रमक आहे. ही उपाययोजना जुजबी असल्याचा आरोप केला आहे. चारा निर्माण करणे गरजेचे आहे, अशी मागणी सदस्यांनी लावून धरली आहे.