आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कराच्या संवेदनशील क्षेत्रात चौघांची घुसखोरी, पाकिस्तानातील व्हॉट्स अॅप ग्रूपचे सदस्य असल्याचे निष्पन्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आर्मर्डकोअर सेंटर अँड स्कूलच्या ‘बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट’मध्ये चार युवकांनी गुरुवारी थेट गोळीबार केंद्रापर्यंत घुसखोरी केल्याचे जवानांच्या लक्षात आले. त्यांना पकडून पोलिसांकडे देण्यात आले. मुख्य आरोपीच्या मोबाइलमध्ये थेट पाकिस्तान, बांगलादेश इराणच्या क्रमांकाशी अनेकदा संभाषण झाल्याचे आढळल्याने या प्रकाराचे गांभीर्य वाढले आहे. या चौघांवर विनापरवानगी लष्कराच्या केंद्रात घुसल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. 
 
गुरूवारी सायंकाळी च्या सुमारास या चौघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली. लष्करी अधिकारी पोलिसांनी तब्बल दहा तास चौकशी केली. ख्वाजा मख्तुम शेख (वय २३, जवळी लोहारा, उस्मानाबाद), शहानवाज इस्माईल कुरेशी (वय २०, नळदुर्ग, कुरेशी गल्ली, उस्मानाबाद), इम्रान कारभारी मुस्तफा (वय २१, सय्यद हिप्परगा, लोहारा, उस्मानाबाद) दौलसा मख्तुम शेख (२३, जोवाली लोहारा, उस्मानाबाद) अशी अटक केलेल्या युवकांची नावे आहेत. 
या चौघांनी भिंगार कॅम्प परिसरातील लष्करी हद्दीत असलेल्या बेसिक ट्रेनिंग रेजिमंेटच्या परिसरात कुंपणावरुन उड्या मारुन प्रवेश केला. ‘बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट’मधील गोळीबार केंद्रात हे चौघे बसले होते. लष्कराचे काही जवान चार क्रमांकाच्या प्रवेशद्वारावर ड्युटीवर होते. गस्त घालत असताना जवानांनी या युवकांना पाहिले. त्यांनी तत्काळ युवकांना ताब्यात घेतले. यापूर्वीही या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई असल्याचे सांगूनही ते आत आल्यामुळे त्यांना पकडून वरिष्ठांपुढे हजर करण्यात आले. 
 
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या युवकांची कसून चौकशी करत त्यांच्या ओळखपत्राची विचारणा केली. प्राथमिक चौकशीत युवकांनी व्यवस्थित उत्तरे दिल्याने त्यांची झडती घेण्यात आली. चौघांपैकी एकाकडे आधार कार्ड सापडले. सर्वांनी त्यांची नावे लष्करी अधिकाऱ्यांना सांगितली. लष्करी परिसरात अपराध करण्याच्या उद्देशाने हे युवक आल्याचा संशय बळावल्याने जवानांनी पोलिसांना घटनेची कल्पना दिली. युवकांना घेऊन त्यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाणे गाठले. 
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, सहायक निरीक्षक विनोद चव्हाण, दहशतवादविरोधी सेल, राज्य गुप्तवार्ता गुप्तचर विभागाचे अधिकारीही तेथे आले. चारही युवकांची पुन्हा सुमारे सहा तास कसून चौकशी करण्यात आली. शुक्रवारी पहाटे याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. परवानगी नसतानाही अनधिकृतपणे प्रवेश केल्याचा गुन्हा युवकांवर नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. 
 
ढिलाई महागात पडेल 
आर्मर्ड कोअरचे मुख्यालय नगरमध्ये आहे. मेकॅनाईज्ड रेजिमेंटल सेंटरचेही मुख्यालय येथे आहे. रणगाडा हे या आर्मर्ड कोअरचे महत्त्वाचे अस्त्र आहे. येथील मुख्यालयाबरोबरच हे देशातील अतिशय महत्त्वाचे लष्करी प्रशिक्षण केंद्र आहे. ‘बीटीआर’ हा या त्याचाच एक भाग आहे. येथे जवानांना प्रशिक्षण दिले जाते. आर्मर्ड कोअरमध्ये जवानांबरोबर अधिकाऱ्यांनाही आधुनिक युद्ध प्रशिक्षण दिले जाते. आपल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांबरोबरच मित्रदेशांचे लष्करी अधिकारीही येथे प्रशिक्षण घेत असतात. त्यात नेपाळ, बांग्लादेश, म्यानमार, श्रीलंका यासह आशिया, आफ्रिका युरोपमधील देशांचा समावेश आहे. त्यामुळे सुरक्षेतील ढिलाई खूप महागात पडणारी आहे, असे मत एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने व्यक्त केले. गोळीबार केंद्रापर्यंत हे चौघे विनाअडथळा पोहोचले. त्यांना जेथे पकडण्यात आले तेथूनच जवळ दारूगोळ्याचे कोठार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. 
 
सुरक्षेतील उणिवा उघड 
आर्मडकोअर सेंटरमधील गोळीबार केंद्राचा परिसर अतिशय संवेदनशील आहे, तरीही उस्मानाबादच्या युवकांनी त्यात सहज प्रवेश केला. हा धक्कादायक प्रकार घडल्याने सुरक्षेतील उणिवाही उघड झाल्या आहेत. स्वातंत्र्यदिन जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे कोणीही सहज लष्करी भागात प्रवेश करणे, ही अतिशय गंभीर बाब आहे. जितक्या सहजपणे त्यांनी लष्करी हद्दीत प्रवेश केला, त्यावरुन सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेनंतर एससीसी अँड एस आस्थापनेच्या आवारात सतर्कता बाळगली जात असून ओ‌ळखपत्राशिवाय प्रवेश दिला जात नाही. 
 
पाकिस्तानातील व्हॉट्स अॅप ग्रूप 
लष्करी अधिकारी पोलिसांनी केलेल्या चौकशीत युवकांबद्दल धक्कादायक माहिती समोर आली. अटक केलेल्या युवकांकडे आढळलेल्या मोबाइलमध्ये पाकिस्तानसह इतर राष्ट्रांतील काही फोन नंबर सेव्ह केलेले होते. युवकांच्या व्हॉट्स अॅपमध्येही पाकिस्तानातील काही ग्रूप आढळले. त्यातील बहुतांश संभाषण उर्दू भाषेत आहे. हे युवक नेमके कोणाशी काय संभाषण करत होते, याची शहानिशा करण्यात आली. एक युवक एमआयडीसीतील कारखान्यात विक्री प्रतिनिधी म्हणून काम करतो. त्याला या भागात दुसऱ्यांदा पकडल्याचे समजले. 
 
‘बीटीआर’च्या कुंपणाची दुरवस्था 
या चौघांनी जेथून प्रवेश केला, ते ठिकाण औरंगाबाद महामार्गावर वसंत टेकडीसमोर आहे. पूर्वी तेथून रस्ता होता. तो आता बंद करण्यात आला आहे. तेथील भिंतही तीन फुटांपेक्षा उंच नाही. त्यामुळे ती ओलांडणे कोणालाही सहज शक्य आहे. मुकुंदनगर परिसरही ‘बीटीआर’ला लागूनच आहे. या भागातील कुंपणाची स्थिती अतिशय शोचनीय आहे. या भागातून कोणीही सहज आत घुसू शकतो, असे तेथील रहिवाशांनीच सांगितले. त्यामुळे ठरावीक अंतरावर टेहळणी मनोरे उभारल्यास सर्व परिसरावर कडक लक्ष ठेवणे सहज शक्य होणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...