आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झटपट श्रीमंत होण्याच्या नादात चौघे युवक गजाआड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - इतरधंदे करुन वैतागलेल्या युवकांना झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट चलनी नोटा व्यवहारात आणण्याचा मार्ग सोपा वाटला. हाच अवैध मार्ग त्यांना गजाआड घेऊन गेला. बनावट चलनी नोटांचा धंदा करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री जेरबंद केले. मनमाड रस्त्यावरील हॉटेल पारिजातसमोर ही कारवाई झाली. आरोपींमध्ये नेवासे तालुक्यातील घोडेगाव, शेवगाव नगरच्या युवकांचा समावेश आहे. एकाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची, तर एकाची पत्रकारितेची आहे.
संदेश बबन गवारे, विलास प्रभाकर प्रधान (दोघेही घोडेगाव, ता. नेवासे), प्रवीण शशिकांत राऊत शाहिद शेख (शेवगाव) अशी आरोपींची नावे आहेत. बनावट चलनी नोटा विकण्यासाठी एक युवक नगरला येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पारिजात परिसरात सापळा रचून ही कामगिरी केली.

पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार सोने, हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, मन्सूर सय्यद, पोलिस नाईक दत्ता हिंगडे, भागिनाथ पंचमुख, उमेश खेडकर, रवीकुमार सोनटक्के, राहुल हुसळे, जितेंद्र गायकवाड, मनोज गोसावी, शैलेश गोमसले, रोहित मिसाळ, सचिन मिरपगार यांचे पथक भिस्तबाग चौक परिसरात गस्त घालत होते. पल्सर मोटारसायकलीवर काही युवक तेथे आले. संशय आल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन लाख नऊ हजार रुपयांची रोकड आढळली. सर्व नोटा हजार पाचशे रुपयांच्या होत्या. वरकरणी या नोटा खऱ्या वाटत होत्या. पोलिसांनी नोटा तपासण्याचे मशीन मागवून या नोटा तपासल्या, तेव्हा सर्वच नोटा खोट्या असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी युवकांकडे चौकशी केली असता त्यांनी शेवगाव घोडेगावच्या एका युवकाचे नाव सांगितले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी पोलिसांनी तोफखाना ठाण्यात गुन्हा नोंदवला. गवारे, प्रधान, राऊत शेख यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. शनिवारी दुपारी चौघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक विकास काळे सरकारी वकिलांनी गुन्ह्याच्या अधिक तपासाकरिता त्यांना पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. ती मान्य करत न्यायालयाने आरोपींना दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आरोपींकडून बनावट नोटांचे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

झटपट श्रीमंतीचा मार्ग
आरोपीं पैकी घोडेगावातील दोन युवकांची पार्श्वभूमी चांगल्या घरची आहे. त्यापैकी एक जबरी चोऱ्यांच्या गुन्ह्यात काही वर्षांपूर्वी गजाआड होता. दुसऱ्याने वेगवेगळे व्यवसाय केले आहेत. त्यांची ओळख शेवगावच्या युवकाशी झाली. त्यानेच यांना झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट नोटा चलनात आणण्याचा मार्ग दाखवला. लाखाच्या बनावट नोटांमागे आरोपींना ४० ते ६० हजार रुपये मिळत असल्याचे समजले.

आंतरराज्य रॅकेटचा संशय
युवकांकडे आढळून आलेल्या लाख हजार रुपयांचा नोटा बनावट होत्या. या नोटा आरोपी युवकांकडे कोठून आल्या, यापूर्वी अशा प्रकारच्या किती बनावट नोटा त्यांनी कोठे विकल्या, या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. यामागे आंतरराज्य रॅकेट असल्याचाही संशय आहे.

पत्रकार असल्याचे सांगून दबावाचा प्रयत्न
बनावट नोटा चलनात आणण्याच्या रॅकेटमधील युवकांना ताब्यात घेतले असता एका आरोपीने पोलिसांना आपण पत्रकार असल्याचे सांगितले. एका नामांकित वर्तमानपत्रात कार्यरत असल्याचे सांगून त्याने निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसी हिसका दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. मुळात तो काही वर्षांपूर्वी जबरी चोऱ्यांच्या गुन्ह्यात गजाआड झालेला आहे. नंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत आपला सहभाग असल्याचे कबूल केले.
बातम्या आणखी आहेत...