आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योगांमधील उत्पादन 40 टक्क्यांनी घटले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- आर्थिक मंदी व दुष्काळाचा नगर शहरासह जिल्ह्यातील 800 उद्योगांना फटका बसला असून या उद्योगांमधील 40 टक्के उत्पादन घटले आहे. सध्या अनेक मोठय़ा व लघू उद्योगांमध्ये मालाची मागणी घटल्याने अनेक कारखाने कामगारांना अर्धा पगार देऊन आठ दिवस बंद ठेवत आहेत, तर काही कारखान्यांमध्ये एक किंवा दोन पाळ्यांमध्ये काम सुरू आहे. उत्पादन घटल्याने आर्थिक उलाढालही मोठय़ा प्रमाणात कमी झाली आहे.

नगर शहर व जिल्ह्यात 6 हजार 500 उद्योग असल्याची अधिकृत नोंद जिल्हा उद्योग केंद्राकडे आहे. यात खासगी कारखाने, लघु उद्योग, सुक्ष्म उद्योग व सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. नगर शहरातील नागापूर एमआयडीसीला 37 वर्षांपूर्वी राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली होती. मंजुरीनंतर या औद्योगिक वसाहतीत पहिले दोन मोठे उद्योग (गरवारे व सह्याद्री) आले. त्यानंतर कॉम्प्टन, एल अँण्ड टी, सीसी इंजिनिअरिंग व कमिन्स हे उद्योग दाखल झाले. सध्या नागापूर औद्योगिक वसाहतीत 720 मोठे व लघू उद्योग आहेत. सुपे औद्योगिक वसाहतीत 80 छोटे व मोठे उद्योग आहेत. नागापूर व सुपा या दोन उद्योगांमध्ये सध्या 12 हजारांहून अधिक कामगार आहेत. नागापूर व सुपा औद्योगिक वसाहतीतील मोठय़ा व छोट्या उद्योगांमधून दरवर्षी सुमारे पाच ते सहा हजार कोटींची आर्थिक उलाढाल होते. मात्र, आर्थिक मंदी व दुष्काळामुळे या उद्योगांमधून मालाची मागणी 40 टक्क्यांनी घटली आहे. मागणी घटल्यामुळे कारखान्यांमधील उत्पादन कमी झाले आहे. गेल्या वर्षी या दोन औद्योगिक वसाहतींतील कारखान्यांमधून सुमारे 4 हजार कोटींची उलाढाल झाली होती. यंदा मात्र केवळ अडीच हजार कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. उत्पादन घटल्याने त्याचा मोठा फटका कारखानदारांबरोबरच कामगारांना बसत आहे. सध्या अनेक कारखान्यांमध्ये मालाला मागणी घटल्याने एक किंवा दोन पाळ्यांमध्ये कामे सुरू आहेत. अनेक कारखान्यांनी रात्रपाळीचे काम बंद केले आहे. सध्या जिल्ह्यासह राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.दुष्काळामुळे ग्रामीण भागात रोहयोची कामे आहेत. मात्र, रोजंदारी कमी असल्यामुळे व त्या कामाचे पैसे वेळेवर मिळत नसल्यामुळे बेरोजगार तरुण शहरातील औद्योगिक वसाहतींत कारखान्याच्या प्रवेशद्वारावर कामासाठी चकरा मारत आहेत. मात्र, सध्या उत्पादनाला मागणी नसल्याने व आहे त्याच कामगारांना काम नसल्याने या तरुणांना कारखान्यांच्या प्रवेशद्वारावरूनच मागे फिरावे लागत आहे.

औद्योगिक वसाहतीतील उद्योग व कामगार

जिल्ह्यात एकूण उद्योग- 6 हजार 500, कामगार 20 हजार, नागापूरमधील मोठे उद्योग -70, कामगार 2 हजार 500, लघू उद्योग - 650, कामगार 7 हजार 500 या प्रमाणे आहेत.