आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगमनेरात ४०० किलो मांस जप्त; तिसऱ्यांदा कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - शहर पोलिसांनी शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यावर सलग दोनदा केलेली कारवाई चर्चेत असताना गोपनीयरित्या दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा पोलिसांनी कारवाई करत बाजारात विक्रीसाठी जात असलेले सुमारे ४०० किलो गोवंशाच्या जनावरांचे मांस पकडले. वादग्रस्त कत्तलखान्याच्या परिसरातच पोलिसांनी रात्रीच्या वेळी ही कारवाई केली.
संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गोवंशाच्या हत्येविरोधात काही वर्षांपूर्वी विधानसभेत लक्ष्यवेधी देखील उपस्थित झाली होती. मात्र, या गोरखधंद्याला मिळणाऱ्या अभयामुळे यावर कारवाई होत नव्हती. पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी प्रथमच या व्यवसायावर कारवाईचे धाडस दाखवले. त्यांनी केलेल्या कारवाईत हजारो किलो गोवंश मांस पकडण्याबरोबरच २१२ जिवंत जनावरांची सुटका केली हाेती. यात काही गायांचादेखील समावेश होता. चव्हाण यांची राज्यातील ही सर्वाधिक मोठी कारवाई ठरली होती. त्यानंतरही कत्तलखाने बंद होण्याची चिन्हे दिसेनात म्हणून त्यांनी याकडे लक्ष वळवत काही दिवसांपूर्वी पुन्हा आपल्या अधिकाऱ्यांकरवी दुसऱ्यांदा या कत्तलखान्यावर छापा टाकत कारवाई केली होती. गुरुवारी रात्री अकरा वाजता पुन्हा पोलिसांनी कोल्हेवाडी रस्त्यालगत असलेल्या मदिनानगर भागात छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी गोवंश मांसासह एक लाख वीस हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिस कॉन्स्टेबल धनंजय हासे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींवर कारवाई केली.
एका जणाला घेतले ताब्यात
निरीक्षकनितीन चव्हाण यांनी घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक अन्सार इनामदार यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथक पाठवले. रात्री अकराच्या सुमारास इनामदार आणि सहकाऱ्यांनी या ठिकाणी कारवाई करत मिनी अॅपे पॅगोत (एमएच ४६ ३०६४) बाजारात विक्रीसाठी जात असलेले साठ हजार रुपये किमतीचे गोवंश मांस आणि साठ हजार रुपयांची पॅगोसह गुलाम फरीद शाबीर कुरेशी (१९, मदिनानगर) याला ताब्यात घेतले, तर शब्बीर सरोवर कुरेशी हा फरार झाला. उपनिरीक्षक अन्सार इनामदार या प्रकरणी तपास करत आहेत.