आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 450 Delivery Within Month, But Two Gynecology Expert

महिन्यात 450 प्रसूती; पण दोनच स्त्रीरोगतज्ज्ञ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगरपालिकेची महापालिका होऊन दहा वष्रे उलटली, तरी देशपांडे रुग्णालयातील समस्या संपलेल्या नाहीत. उलट समस्या कमी होण्याऐवजी त्या अधिक वाढल्या आहेत. विनामूल्य व विश्वसनीय सेवेमुळे रुग्णालयाचे नाव जिल्हाभर पोहोचले. या ठिकाणी प्रसूतीसाठी दररोज 10 ते 15 महिला दाखल होतात. केवळ शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील महिलाही या रुग्णालयात येतात. परंतु त्यांना सेवा देत असताना रुग्णालयातील उपलब्ध डॉक्टर व कर्मचार्‍यांची मोठी दमछाक होत आहे. रुग्णालयाने पुरेसे डॉक्टर व कर्मचार्‍यांची प्रशासनासह पदाधिकार्‍यांकडे अनेकदा मागणी केली. परंतु प्रत्येक वेळी या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली. सध्या रुग्णालयात केवळ दोनच स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. याशिवाय दोन पूर्णवेळ, तर चार अर्धवेळ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, प्रसूतीचे दररोजचे प्रमाण पाहता डॉक्टरांची संख्या तोकडी आहे. रुग्णाला भूल देण्यासाठी देखील येथील डॉक्टरांना बाहेरच्या भूलतज्ज्ञांवर अवलंबून राहावे लागते. ऐनवेळी भूलतज्ज्ञ उपलब्ध न झाल्यास रुग्णावरील शस्त्रक्रीया थांबवावी लागते. एखाद्या महिलेचे अचानक सिझेरियन करावे लागले, तर स्त्रीरोग तज्ज्ञांना रात्रीच्या वेळी देखील रुग्णालयात धाव घ्यावी लागते.


रुग्णालयातील जनरल वॉर्ड व प्रायव्हेट रुममध्ये जवळपास 70 ते 80 महिला दररोज उपचार घेतात. परंतु त्यांच्या देखरेखीसाठी रुग्णालयात अवघ्या 14 नर्स आहेत. ‘आयां’ची देखील तीच स्थिती आहे. रुग्णांच्या सेवेसाठी केवळ 35 आया आहेत. 14 नर्स व 35 आया दररोज तीन पाळ्यांमध्ये काम करून 70 ते 80 महिला रुग्ण व त्यांच्या बाळांची काळजी घेतात. प्रसुती, सिझर, बाळाजी काळजी, देखरेख, औषधांची माहिती, बाळाच्या जन्माचे रेकॉर्ड असे एक ना अनेक कामे नर्स व आयांना करावी लागतात. एवढय़ा धावपळीत एखाद्या महिला रुग्णाकडे दुर्लक्ष झाल्यास नातेवाईकांची बोलणी ऐकावी लागतात. त्यामुळे काम करावे, तरी कसे? असा प्रश्न येथील डॉक्टर व कर्मचार्‍यांसमोर उपस्थित झाला आहे. त्याकडे महापालिका प्रशासन व पदाधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आतापर्यंत नोवलौकिक असलेल्या या रुग्णालयाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


रुग्णालयातील अनेक आया निवृत्त झाल्या, तरी महापालिकेने गेल्या दहा वर्षांत नवीन आयांची भरती केली नाही. सत्ताधारी केवळ रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा देऊ, नूतनीकरण करू, इमारत बांधू, कर्मचार्‍यांची भरती करू, अशी आश्वासने देतात. परंतु प्रत्येक्षात काहीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे रुग्णालयाची अवस्था वर्षानुवर्षांपासून आहे, तशीच आहे.


आरोग्याधिकार्‍यांकडून टाळाटाळ
महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांना रुग्णालयातील रिक्त पदांबाबत काय कार्यवाही केली. उपलब्ध डॉक्टर व कर्मचार्‍यांना सेवा देण्यात काय अडचणी येतात, याबाबत विचारणा करण्यासाठी संपर्क केला असता, त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली पाटील यांनीही बोलणे टाळले.

डॉक्टरांसह कर्मचार्‍यांची कसरत
उपलब्ध डॉक्टर, नर्स व आया यांना रुग्णालयात काम करताना कसरत करावी लागते. त्यांना रात्री 8 ते सकाळी 8, सकाळी 8 ते दुपारी 2 व दुपारी 2 ते रात्री आठ अशा तीन शिफ्टमध्ये काम करावे लागते. त्यात रात्री केवळ 2 नर्स, 4 आया व दोन डॉक्टर असतात. दिवसाही नर्स व आयांवर कामाचा अतिरिक्त भार असतो. त्यामुळे नर्स व आयांची भरतीची गरज असल्याचे एका नर्सने सांगितले.

35 वर्षे सेवा; पण बदल काहीच नाही
रुग्णालयात गेल्या 35 वर्षांपासून सेवा करत आहे, आता निवृत्त होण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत अनेक सत्ताधारी व अधिकारी आले, प्रत्येकाने रुग्णालयाचा कायापालट करण्याचे आश्वासने दिली. नवीन इमारत बांधू, नूतनीकरण करू, अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करू, अशी अनेक आश्वासने ऐकली. परंतु प्रत्यक्षात काहीच झाले नाही, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ महिला कर्मचार्‍याने दिली.

रुग्णालयाचा कायापालट करणार
युतीच्या काळात सत्ताधार्‍यांनी रुग्णालयाकडे दुर्लक्ष केले. रुग्णालयातील अनेक पदे रिक्त आहेत, ते भरण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे महापौरपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कर्मचारी भरतीसाठी शासनाकडे आकृतिबंधाचा सुधारित प्रस्ताव पाठवला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर रुग्णालयातील रिक्त पदे भरली जातील. आतापर्यंत रुग्णालयाकडे दुर्लक्ष झाले असले, तरी आमच्या सत्ता काळात रुग्णालयाचा कायापालट करणार आहे. त्यासाठी रुग्णालयाच्या नूतनीकरणाचा प्रश्न मार्गी लावणार आहे. शासनाकडून निधी मिळाला नाही, तरी महापालिका निधीतून रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात येईल.’’ संग्राम जगताप, महापौर.

मुलांचा अतिदक्षता विभागच नाही
या रुग्णालयात मोठय़ा प्रमाणात प्रसुती होतात. अनेकदा निकषांपेक्षा लहान असलेल्या बाळांचा जन्म होतो. त्यांना इन्क्युबेटर किंवा दक्षता विभागात ठेवण्याची गरज असते. या रुग्णालयात ही व्यवस्थाच नसल्याने बाळांना खासगी रुग्णालयांत ठेवावे लागते. आई बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात व बाळ दुसरीकडेच अशी स्थिती कायम असते. त्यामुळे येथे बाळांसाठी अतिदक्षता विभाग तातडीने उभारण्याची गरज असल्याचे एका डॉक्टरने सांगितले. रुग्णालयात स्वच्छतेकडेही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे प्रसूत महिला व नवजात अर्भक यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
>महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात डॉक्टर व कर्मचार्‍यांची वानवा
>महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात दिवस असो की रात्र प्रसुतीचे सत्र सुरूच असते. महिन्याला किमान 450 महिलांची प्रसूती व 50 ते 60 सिझेरिनच्या शस्त्रक्रिया येथे होतात. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे या रुग्णालयात केवळ दोनच स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. इतर कर्मचार्‍यांचीही मोठय़ा प्रमाणात वानवा आहे. त्यामुळे सर्वांत जुने व विश्वसनीय म्हणून ओळखल्या जाणार्‍या या रुग्णालयात रुग्णांसह डॉक्टर व कर्मचार्‍यांची हेळसांड होत आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

यांच्या खांद्यावर रुग्णालयाची धुरा
0स्त्रीरोगतज्ज्ञ- 2 ( गरज 4) 0 पूर्णवेळ डॉक्टर- 2 (गरज 5) 0 अर्धवेळ डॉक्टर- 4 (गरज 7) 0 नर्स - 14 (गरज 20) 0 आया- 35 (गरज 60), शिपाई- 4 (गरज 8) 0स्वच्छता कर्मचारी- 3 (गरज 8).


अशी आहे रुग्णसेवा
0 ऑपरेशन थिएटर :1 0 डिलीव्हरी रुम- 1 (7 टेबल)
0 विशेष रुम : 11 (एका रुममध्ये 4 बेड)
0 जनरज वॉर्ड : 42 कॉट (र्मयादा 32)

रिकव्हरी रुमच नाही
प्रसूती अथवा सिझेरियनची शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिलेला अधिक काळजी घेण्यासाठी रिकव्हरी रुममध्ये ठेवावे लागते. परंतु या रुग्णालयात ही रुमच अस्तित्वात नाही. ऑपरेशन थिएटरमधून रुग्णाला थेट बाहेर खोलीत हलवले जाते. त्यामुळे जंतूसंसर्गाचा मोठा धोका असतो. मात्र, कोणीही याकडे गांभीर्याने पाहत नाही, अशी स्थिती आहे. याकडे रुग्णालयातील डॉक्टर लक्ष वेधतात पण त्यांना कोणीही दाद देत नाही.