आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४६ कोटींची थकबाकी वसूल, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा १३ कोटींची वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जानेवारी मार्च महिन्यात शास्तीमाफीची सवलत दिल्याने महापालिकेेच्या तिजोरीत मार्चअखेर तब्बल ४६ कोटी २२ लाखांची थकबाकी जमा झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वसुलीत १३ कोटींनी वाढ झाली आहे. आतापर्यंत झालेली वसुली समाधानकारक असली, तरी बड्या थकबाकीदारांवरील जप्तीची कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनी बुधवारी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.
शहरातील थकबाकीदारांचा आकडा दरवर्षी वाढत चालला आहे. लहान-मोठ्या थकबाकीदारांकडे तब्बल दीडशे कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे. या वर्षी जानेवारी मार्च या दोन महिन्यासांठी थकबाकीदारांना शास्तीमाफीची सवलत देण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत ४६ कोटी २२ लाखांची थकबाकी जमा झाली. त्यात सर्वाधिक १६ कोटी ८१ लाखांची वसुली सावेडी प्रभागात झाली. आतापर्यंत झालेली वसुली समाधानकारक असली, तरी अद्याप शंभर कोटींपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे. मनपा प्रशासनाकडून दरवर्षी शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात येते. त्यासाठी जप्ती मोहीम राबवण्यापर्यंतची तयारी प्रशासनाकडून केली जाते. प्रत्यक्षात मात्र जप्ती मोहीम राबवलीच जात नाही. त्यामुळे निर्ढावलेले हजारो थकबाकीदार थकबाकी भरण्याकडे पाठ फिरवतात. यावर्षी देखील शास्तीमाफीची सवलत दिल्याने सर्वसामान्य थकबाकीदारांनी पैसे भरले. बड्या थकबाकीदारांनी मात्र या सवलतीकडे ढुंकूनही पाहिले नाही. परिणामी मनपा प्रशासनाचे शंभर टक्के वसुलीचे स्वप्न पुन्हा एकदा हवेत विरले. येत्या चार महिन्यांत (१ ऑगस्टपासून) एलबीटी बंद होणार आहे. त्यानंतर महापालिकेसमोर मोठा आर्थिक प्रश्न निर्माण होणार आहे. तो सोडवण्यासाठी जास्तीत जास्त थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करावे लागणार आहेत.

कर्मचाऱ्यांचे पगार, वीजबिलाचा खर्च, पाणी योजना देखभाल दुरूस्तीचा खर्च, तसेच विविध शासकीय योजनांचा हिस्सा भरताना मनपाचे कंबरडे माेडले आहे. थकीत िबले मिळत नसल्याने ठेकेदार कामे करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे शंभर टक्के थकबाकी वसुलीशिवाय मनपाचा कारभार चालणे कठीण आहे.

विभागनिहाय वसुली (कोटींत)
सावेडी- १६.८१
शहर - १०.८७
झेंडीगेट - ५.४३
बुरूडगाव - १३.८२

शास्तीमाफीने मनपाचे कोट्यवधींचे नुकसान
मागीलवर्षी केवळ ३३ कोटींची थकबाकी वसूल झाली होती. यावर्षी त्यात १३ कोटींनी वाढ झाली आहे. मात्र, ही वाढ शास्तीमाफीच्या सवलतीमुळे झाली आहे. एकूण थकबाकीपैकी शास्तीची रक्कम ४० कोटींपेक्षा अधिक आहे. दोन महिने सवलत दिल्याने थकबाकीदारांनी पैसे भरले, परंतु शास्तीच्या रकमेचा आकडा मात्र कमी झाला आहे. त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.