आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

480 तपस्वींची नगरमध्ये वरघोडा मिरवणूक, आनंदधामच्या प्रांगणात उत्साहात कार्यक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - चातुर्मासात तप आराधना करणाऱ्या ४८० लहान-मोठ्या तपस्वींचा सन्मान, वरघोडा मिरवणूक, अनुमोदना, भावा गायन अशा विविध कार्यक्रमांमुळे रविवारी आनंदधाम परिसरात चैतन्यमय वातावरण तयार झाले होते. 
 
साध्वी किरणप्रभाजी, श्रीदर्शनप्रभाजी, श्रीअनुपमाजी, श्रीजिनेश्वराजी आदींच्या सान्निध्यात तप अनुमोदना भावा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पवित्र अनुमोदना बारम् बार, अनुमोदना बारम् बार अशा गीतांनी तपस्वींचा गौरव करत हजारो श्रावक-श्राविकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. 
 
चातुर्मासात मासखमन (३१ उपवास), ४०० तेला (३ उपवास) अठाई, नऊ उपवास, अकरा उपवास, पंधरा उपवास, एकवीस उपवास अशी तपस्या करण्यात येते. यंदा या तप आराधनेत तब्बल ४८० तपस्वींनी भाग घेतला. यात लहान मुलांपासून वयोवृध्दांचा सहभाग होता. सर्व तपस्वींची धार्मिक परीक्षा बोर्ड परिसरात वरघोडा मिरवणूक काढण्यात आली. तपस्वी पुरुषांनी लाल पगडी मोत्याची माळ, तर महिला तपस्वींनी मुकुट परिधान केला होता. १५ ते ३१ दिवसांचे उपवास करणाऱ्या तपस्वींचा जैन श्रावक संघाच्या वतीने सोन्याचा हत्ती चांदीचे ग्लास भेट देऊन सत्कार करण्यात आला. अन्य तपस्वींचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
 
यावेळी श्रावक संघाचे सचिव संतोष बोथरा, आनंदराम मुनोत, अशोक पारख, संपतलाल बाफना, संतोष गांधी, नितीन कटारिया उपस्थित होते. तपस्वींच्या सन्मानार्थ भावा गायनाचा कार्यक्रम झाला. यात आनंदधाम महिला मंडळ, ब्राह्मणी युवती मंच, कीर्ती बहु मंडळ, प्रमोद सखी मंडळ, सारसनगर भक्त मंडळ, आनंद सखी मंडळ, आनंदतीर्थ ग्रूपने सहभाग घेतला. जय हो महिला ग्रूपने सादर केलेल्या पारंपरिक गरबा नृत्याने कार्यक्रमाची शोभा वाढवली. सूत्रसंचालन मनीषा मुनोत पूजा ओस्तवाल यांनी केले. 
 
कार्यक्रमासाठी चांदमल ताथेड, अशोक बोरा, विलास गांधी, अनिल मेहेर, अभय लुणिया, आनंद चोपडा, राजेश बोरा, अमोल कटारिया, नीलेश पोखरणा आदींसह श्रावक संघाचे पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले. आनंदऋषीजींच्या ध्वनिमुद्रित मंगलपाठाने सांगता झाली. गौतम प्रसादीची व्यवस्था संपतलाल बाफना, नरेंद्र बाफना, प्रशांत बाफना बाफना परिवारातर्फे करण्यात आली होती. 
बातम्या आणखी आहेत...