आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच हजारांवर मुलांनी दिली प्रदर्शनाला भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - चाचा नेहरूंच्या स्मृती जागवत नगरच्या भुईकोट किल्ल्यातील प्रदर्शन पाहण्यासाठी पाच हजारांवर शाळकरी मुलांनी शुक्रवारी गर्दी केली. मिलिटरी बँडच्या सुरावटीने प्रसन्न झालेल्या वातावरणात मुलांनी चित्रं काढण्याचाही आनंद घेतला.

नगर शहराचे ५२५ वे स्थापना वर्ष, पंडित नेहरूंची १२५ वी जयंती आणि पहिल्या महायुद्धाच्या शताब्दीनिमित्त ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाच्या वतीने किल्ल्यातील नेताकक्षाशेजारी आयोजित प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. हे प्रदर्शन रविवार (१६ नोव्हेंबर) पर्यंत सकाळी १० ते ५ यावेळात सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल.

बोअर युद्ध, तसेच पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात दोन हजारांवर युद्धबंद्यांना नगरमधील छावणीत ठेवण्यात आले होते. त्यात अनेक जर्मन नागरिकही होते. त्यांची पत्रे, छायाचित्र, व्यंगचित्रे व पुस्तकांचा समावेश या प्रदर्शनात आहे. योगेश हराळे यांनी काढलेल्या नगर परिसरातील वास्तूंच्या चित्रांचे स्वतंत्र दालन प्रदर्शनात आहे.

जिल्हाधिकारी अनिल कवडे व एसीसी अँड एसचे ब्रिगेडिअर हरपाल सिंह यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन झाले. त्याआधी त्यांनी नेता कक्षात नेहरूंंना पुष्पांजली अर्पण केली. हे प्रदर्शन नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे सांगून नगरचा इतिहास, इथली संस्कृती जपण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. इतिहासाचे विस्मरण झाले, तर भविष्यही घडवता येत नाही, असे ब्रिगेडिअर हरपाल सिंह म्हणाले. लष्करातील आम्हा अधिकाऱ्यांनाही नगर शहर चांगले व्हावे, असे वाटते. या कार्यात आमचाही सहभाग असेल, असे त्यांनी सांगिततले.

संग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रवींद्र साताळकर यांनी प्रास्ताविक केले. भूषण देशमुख यांनी प्रदर्शनाचे औचित्य सांगितले, तर डॉ. शशी धर्माधिकारी यांनी प्रदर्शनात ठेवण्यात आलेले दस्तऐवज कसे मिळवले, हे सांगितले. सूत्रसंचालन अॅड. सतीश भोपे यांनी केले, तर आभार संग्रहालयाचे अभीरक्षक संतोष यादव यांनी मानले. प्रारंभी बालभवनच्या मुलींनी, तर अखेरीस मार्कंडेयच्या मुलींनी देशभक्तीपर गीत सादर केले.

प्रदर्शनासाठी मदत करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. एसीसी अँड एसचे कर्नल अमितेश वर्मा, पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव डॉ. भावे, लेखिका मेधा देशमुख-भास्करन, शिल्पकार प्रमोद कांबळे, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद मिरीकर, प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख, व्हर्सटाईल ग्रूपचे डॉ. महेश मुळे, अंबादास पंगुडवाले, अनिल मेहेर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
पुढील स्‍लाइडवर वाचा, मुलांनी घेतली शपथ .. .