आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Thousand Quesic Water Release From Nilwande For Jayakwadi

निळवंडेतून ५ हजार क्युसेकने पाणी जायकवाडीकडे झेपावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : भंडारदरातून आलेले पाणी गुरुवारी निळवंडे धरणातून सोडण्यात आले. छाया : विलास तुपे, राजूर
अकोले - निळवंडे धरण गुरुवारी दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी ओव्हरफ्लो व्हायला सुरुवात झाली. भंडारदरा, निळवंडे धरणातील जलसाठा नाथसागरात विसावण्यासाठी प्रवरा नदीपात्रातून मराठवाड्याकडे निघाला. सायंकाळी निळवंडे धरणातून जायकवाडीकडे पाच हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. निळवंडे ते प्रवरासंगम हे १७० किलोमीटरचे अंतर विविध अडथळ्यांची शर्यत पार करीत निघालेले हे पाणी सुमारे सहा दिवसांचा प्रवास करील. या प्रवासात पाण्याची चोरी रोखण्यासाठी सरकारने जलसंपदा, महसूल व पोलिस प्रशनातील अधिकारी- कर्मचा-यांची २० भरारी पथके नियुक्त केली आहेत. पाण्याचा व्यत्यय व चोरीवर नियंत्रण ठेवण्याचे कामही भरारी पथके करणार आहेत.

लाभक्षेत्रातील विरोधाला झुगारून प्रशासनाने भंडारदरा-निळवंडे धरणातील पाणी प्रवरा नदीपात्रात सोडले. निळवंडे धरणाच्या भिंतीवरून दुपारी बाराला सुरू झालेला विसर्ग सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाच हजार क्युसेकपर्यंत वाढवला. सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्ही धरण क्षेत्रावर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला असल्याने तिथे पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.
जायकवाडी येथील जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचे नियंत्रण असलेली
दोन विशेष पथके परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.

एक उपअभियंता, दोन शाखा अभियंते व एक तंत्र सहायकासह चार कर्मचारी विशेष पथकात कार्यरत आहेत. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास निळवंडे धरणाच्या भिंतीतील गेटमधून १७०० क्युसेकने विसर्गात वाढ केल्याने प्रवरानदी दुधडी भरून वाहू लागली. रात्री प्रवरेचा हा प्रवाह अकोले शहराला वळसा मारून पुढे प्रवाहीत झाला. निळवंडे धरणापासून ७० किलोमीटर अंतरावरील ओझर (ता. संगमनेर) साठवण बंधा-यात प्रथम हे पाणी साठवले जाईल. या बंधा-यात ओव्हरफ्लोसाठी पुरेसा पाण्याचा साठा झाल्यानंतर तेथून पुन्हा प्रवरापात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.तेथून पुढे राहाता, श्रीरामपूर, नेवासे तालुक्यातील १४ कोल्हापुरी बंधा-यांना ओलांडून पैठणच्या नाथसागरात जाण्यासाठी प्रवरासंगम ते गाठील. अशा मार्गाने भंडारदरा धरणातून चार ते तीन टीएमसी पाणी मराठवाड्यास दिले जाणार आहे. नाथसागराच्या दिशेने प्रवरापात्रातून झेपावलेले हे पाणी शेवटपर्यंत ५० टक्केही पोहचते की नाही याबाबत जलसंपदाच्याच अधिका-यांना शंका आहे.

अनेक गावांची वाहतूक विस्कळीत: निळवंडेच्या विसर्ग काळामध्ये प्रवरानदीवरील सर्व कमी उंचीचे पुल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांची वाहतूक विस्कळीत झाल्याने पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला. अगस्ती मंदिराकडे जाणारा अकोले शहरालतचा मार्ग तसेच विठे, मेहेंदुरी, रुंभोडी पुलावरून सुमारे ८ ते १० फुट उंचीने पाणी वाहत आहे.

आवर्तन काळात फक्त दोन तास वीज पुरवठा : प्रवराकाठच्या अनेक शेतक-यांचे विद्युतपंप व विहिरी जलमय झाल्याने नुकसान झाले आहे. पुढील १० दिवस आवर्तन काळात २४ तासांतून २२ तास विजेचे भारनियमन होणार असल्याने प्रवराकाठच्या ३२ गावांतील पिके पाण्याअभावी जळण्याचा धोका शेतकरी सतावत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दोन तास वीज दिली जाणार आहे.