आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस वसाहतींसाठी ५०० कोटींची तरतूद, गृह राज्यमंत्री राम शिंदे यांची नगरमध्ये माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरी व ग्रामीण भागातील पोलिस वसाहतींची अवस्था वाईट झाली असून, ५०० कोटी रुपये खर्च करून बीओटी तत्त्वावर राज्यात पोलिस वसाहती उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सोमवारी अहमदनगरमध्ये बोलताना दिली.

पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, राज्यातील पोलिसांना सुटीचा पगार पूर्वी ६८ रुपये याप्रमाणे दिला जात होता. आता पोलिसांना पगाराप्रमाणे सुटीचा पगार दिला जाणार आहे. पोलिसांना दर्जेदार घरे मिळावी, यासाठी राज्यात ५०० कोटी रुपये खर्च करून ‘बांधा वापरा व हस्तांतरीत करा’(बीओटी) या तत्त्वावर पोलिसांच्या वसाहती उभारण्यात येणार आहे. राज्यातील नवीन पोलिस ठाणी नव्या नियोजनाप्रमाणे तयार करण्यात येणार आहेत. या पोलिस ठाण्यांमध्ये महिला पोलिसांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबद प्रामुख्याने विचार करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

नगर जिल्ह्यात झालेल्या एका गुन्ह्यातील संशयितांची जैव वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पोलिसांना अन्य राज्यात जावे लागले. ही चाचणी प्रत्येक जिल्ह्यात घेता व्हावी, यासाठी १४ कोटी ५५ लाखांची तरतूद करण्यात येणार असून, त्यासाठी ४५ अधिका-यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. खटल्याचे काम देताना सरकारी वकिलांचे मागील काळातील काम पाहिले जाईल. सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्य सरकार व गृहविभाग प्रयत्नशील आहे, असे शिंदे यांनी सांगितले.