आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरकरांना मीटरद्वारे पाणी देण्याचा प्रस्ताव, 541 कोटींचे अंदाजपत्रक स्थायीसमोर सादर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यावर भर देत ५४१ कोटी २० लाखांचे अंदाजपत्रक महापालिका प्रशासनाने मंगळवारी स्थायी समितीसमोर सादर केले. नगरकरांना मीटरने पाणी देण्याचा प्रस्ताव त्यात आहे. महापालिकेची अार्थिक बाजू भक्कम करण्याच्या दृष्टीने उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त दिलीप गावडे यांनी सभेत स्पष्ट केले. 
 
स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत आयुक्त गावडे यांनी अंदाजपत्रक सादर केले. या वेळी अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांच्यासह स्थायीचे सदस्य सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात सुरुवातीच्या शिलकीसह ५३७ कोटी ६० लाख रुपये जमा, तर ५३६ कोटी ३४ लाख रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. 
 
नागरिकांना मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे. महासभेची मंजुरी मिळताच मीटरची खरेदी करण्यात येणार आहे. मीटरद्वारे पाणीपुरवठा झाल्यास पाण्याची बचत होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. सरकारी अनुदानातून पायाभूत सुविधा अधिक मजबूत करणे, बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाचे नूतनीकरण, अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा, सोलर, उद्यान यांसारखे प्रकल्प पूर्ण करणे, पिंपळगाव माळवी येथील जागेवर वॉटरपार्क प्रकल्प सुरू करणे, थकीत मालमत्ता कर वसुलीवर भर देणे, शहरात एलईडी दिवे बसवणे यासारख्या अनेक तरतुदी अंदाजपत्रकात आहेत.
 
देशपांडे रुग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या महिला त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्याबाबत काही प्रश्न निर्माण झाल्यास त्यांना नुकसानभरपाई देण्याची तरतूद, वीजबचतीसाठी शहराच्या विविध भागात टप्प्याटप्प्याने एलईडी दिवे बसवण्याची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. प्रशासनाने सादर केलेले अंदाजपत्रक फुगीर नसल्याचे सांगत सभापती जाधव यांनी समाधान व्यक्त केले. अंदाजपत्रकाचा अभ्यास करण्यासाठी सभा दोन दिवस सभा तहकूब ठेवण्यात आली. गुरुवारी अंदाजत्रकावर चर्चा होणार आहे. 

उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणार 
उत्पन्नवाढीसाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे. पिंपळगाव माळवी येथील मनपाच्या जागेवर वॉटर पार्कसारखा प्रकल्प उभारून उत्पन्न वाढवता येईल. मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबवू. अार्थिक वर्षात सरकारकडून जेवढे अनुदान मिळणार आहे, तेवढीच रक्कम अंदाजपत्रकात गृहित धरल्याने अंदाजपत्रक फुगलेले नाही.'' दिलीपगावडे, आयुक्त. 
 
यंदाचे अंदाजपत्रक तीनशे काेटींनी कमी 
जे अनुदान सरकारकडून मिळणार नाही, त्याचा समावेश केल्याने प्रशासनाने मागील वर्षी सादर केलेले अंदाजपत्रक फुगले हाेते. यंदा मात्र अंदाजपत्रक फुगणार नाही, याची काळजी घेतली आहे. मागील वर्षी महासभेने ८४९ कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली होती. यंदा मात्र प्रशासनानेच ५४१ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले असून त्यात स्थायी समिती महासभा काही तरतुदींची वाढ सुचवणार आहे. 

अंदाजपत्रक 
}उद्यानसोलरचे प्रकल्प पूर्ण करणार 
} मनपाच्या देशपांडे रुग्णालयाचे नूतनीकरण 
} पायाभूत सुविधा मजबूत करणार 
} नगरकरांना मीटरद्वारे पाणी 
} पिंपळगाव माळवी येथील जागा विकसित करणार 
} कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता 
} अनधिकृत नळजोड मालमत्तांचा शोध 
} थकीत अनुदानासाठी सरकारकडे पाठपुरावा 
} खर्चात काटकसर 
} अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण 
} रक्त विघटन प्रयाेगशाळा सुरू करणार 
} शहर सुशोभित करण्यासाठी खासगी संस्थांची मदत 
} बाळंतपणात गुंतागुंत निर्माण झाल्यास नुकसान भरपाई 
} मंजूर कर्मचारी आकृतिबंधाची अंमलबजावणी 
} विद्युत बचतीसाठी एलईडी दिव्यांचा वापर 
बातम्या आणखी आहेत...