आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतक-यांच्या बँकखात्यांत ५७ कोटींची मदत जमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - खरीप हंगामात पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या नगर जिल्ह्यातील ५१६ गावांमधील शेतक-यांना ५७ कोटी ६० लाखांची मदत राज्य शासनाने जाहीर केली होती. जानेवारीच्या दुस-या पंधरवड्यापासून ही मदत शेतक-यांच्या बँकखात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत ३६८ गावांमधील १ लाख २४ हजार ८८७ शेतक-यांना ५७ कोटी ५९ लाख ७४ हजार ७४० रुपयांची मदत देण्यात आली आहे.

कमी पावसामुळे मागील वर्षी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त भागाची जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाने पाहणी करून याद्या तयार केल्या. पहिल्या पाहणीत पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेली ३५० गावे होती. त्यानंतर अंतिम आणेवारीत आणखी २११ गावे वाढली.

एकूण ५१६ गावे कमी आणेवारी असलेली होती. त्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनाकडे पाठवला होता. पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या ५१६ गावांमधील शेतक-यांना शासनाने मदत जाहीर केली. जिरायत क्षेत्रासाठी हेक्टरी ४ हजार ५००, बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी ९ हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी १२ हजार रुपये अशी मदत जाहीर झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ जानेवारीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरिपातील नुकसानग्रस्त शेतक-यांना ५७ कोटी ६० लाखांची मदत जाहीर केली. ही मदत २६ जानेवारीपर्यंत सर्व शेतक-यांच्या बँकखात्यात जमा करण्याचा निर्णयही शासनाने घेतला. जिल्ह्यात खरिपाचे एकूण क्षेत्र ४ लाख हेक्टर क्षेत्र आहे. टंचाईची झळ २ लाख ८२ हजार ४५३ हेक्टर क्षेत्राला बसली असून, या बाधित क्षेत्राला शासनाने ही मदत जाहीर केली. नुकसानग्रस्त ५१६ गावांपैकी ३६८ गावांमधील १ लाख २४ हजार ८८७ शेतक-यांच्या बँकखात्यात ५७ कोटी ५९ लाख ७४ हजार ७४० रुपये जमा झाले आहेत.

यंदाही टंचाईचे वाढते सावट
मागील वर्षाप्रमाणेच यंदाही पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्यास जिल्ह्याला टंचाईचा सामना करावा लागणार आहे. अवकाळी पाऊस आणि मध्यंतरी झालेल्या गारपिटीचा फटका काही भागातील शेतीला बसला. पाऊस कमी झाल्यास यंदाही शासनाला शेतक-यांना मदतीचा हात द्यावा लागेल.

बाधित गावे व मदत मिळालेली गावे
शेवगाव ३४ ३४
नेवासे १३ १३
राहाता २४ १४
संगमनेर १३८ ७४
पाथर्डी ८० ७०
कोपरगाव १६ १५
नगर ०५ ०३
राहुरी १७ १४
पारनेर ३१ २१
अकोले १५८ ११०