आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल योजनेंतर्गत झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या 693 कुटुंबांना हक्काचे घर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिकेने राबवलेल्या घरकुल प्रकल्पांतर्गत ६९३ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले. कोठी रस्ता, मणियार झोपडपट्टी, पंचशीलवाडी, इंद्रानगर, माळीवाडा आदी ठिकाणच्या झोपडपट्ट्यांमधील ही कुटुंबे आता या घरकुलांमध्ये रहायला गेली आहेत. प्रत्येक कुटुंबाला २६९ चौरस फुटांचे हक्काचे घर मिळाले आहे. माजी महापौर शिला शिंदे यांच्या कार्यकाळातील हा सर्वात महत्त्वाचा प्रकल्प होता. त्यांनी पुढाकार घेतल्याने हा प्रकल्प मार्गी लागून सातशे कुटुंबांच्या घरांची स्वप्नपूर्ती झाली. 

केंद्र राज्य शासनाचा एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना रमाई आवास योजनेंतर्गत महापालिकेने घरकुलांचे तीन प्रकल्प हाती घेतले. वारुळाचा मारुती परिसरात २५२ ११३ घरकुलांचे दोन काटवन खंडोबा परिसरात ३०० घरकुलांचा प्रकल्प आहे. माजी महापौर शिंदे यांच्या कार्यकाळात हे प्रकल्प पूर्ण झाले, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थ्यांना घरांचा ताबा देण्यास विलंब झाला. आता तिन्ही प्रकल्पांच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून लाभार्थी कुटुंबे नवीन घरकुलात राहण्यास आले आहेत. 

या प्रकल्पांसाठी केंद्र राज्य शासनाकडून २० कोटींचा निधी उपलब्ध झाला. त्यात महापालिका लाभार्थींची दहा टक्के रक्कम आहे. प्रत्येक कुटुंबाला सर्व सोयी-सुविधा असलेले हक्काचे घर मिळाले आहे. याशिवाय अनुसूचित जाती-जमातींसाठी स्वत:च्या जागेवर घर बांधण्यासाठी दोन लाखांपर्यंतचे शंभर टक्के अनुदानही महापालिकेने उपलब्ध करून दिले आहे. या योजनेचाही अनेकांनी लाभ घेतला. 

स्वत:चे घर हा प्रत्येकाच्या जीवनातील जिव्हाळ्याचा विषय, परंतु घर बांधणे किंवा विकत घेणे सर्वांनाच शक्य होत नाही. वाढलेली महागाई, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आजारपण अशा एकना अनेक कारणांमुळे अनेकांचे घराचे स्वप्न शेवटपर्यंत स्वप्नच राहते. महापालिकेने मात्र तब्बल सातशे कुटुंबांच्या घराचे स्वप्न पूर्ण केले. या घरकुलांमध्ये शहराच्या विविध भागांतील झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले. माजी महापौर शिंदे यांनी स्वत: या कामाकडे लक्ष दिले. वेळोवेळी बैठका घेऊन, तसेच प्रत्यक्ष कामाची पाहणी करून प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना आता मूर्त स्वरूप आले. तिन्ही प्रकल्पांमध्ये लाभार्थ्यांना केवळ घरेच मिळाली नाहीत, तर अंतर्गत रस्ते, ड्रेनेजलाइन, संरक्षक भिंत, पथदिवे, उद्यान अशा अनेक सुविधाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे प्रकल्प म्हणजे शहरातील एखाद्या मोठ्या खासगी गृहप्रकल्पांप्रमाणेच झाले आहेत. 

दोन दिवसांत मीटर बसणार 
घरकुल प्रकल्पांमध्ये ६० टक्के लाभार्थी राहण्यासाठी आले आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे लाभर्थ्यांना घरांचा ताबा लवकर देता आला नाही. परंतु आता सर्व प्रश्न सुटले आहेत. दोन-तीन दिवसांत पाण्याच्या उंच टाकीची चाचणी घेण्यात येणार आहे. तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दोन दिवसांत विजेचे मीटर बसतील. त्यानंतर या घरांमध्ये राहणाऱ्या संबंधित लाभार्थ्यांची कोणतीच गैरसोय होणार नाही.
- आर. जी. मेहेत्रे, प्रकल्प अभियंता. 

मनपाचे सफाई कर्मचारी सुखावले 
नगरपालिका आताच्या महापालिकेत सफाई कामगार म्हणून २५ वर्षे सेवा करणाऱ्या ११३ कर्मचाऱ्यांनाही हक्काची घरे मिळाली आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांना एक रुपयादेखील खर्च करावा लागला नाही. डॉ. आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत ही घरे देण्यात आली. मनपाचे हे सफाई कर्मचारी भाड्याच्या घरात रहात होते. आता हक्काची घरे मिळाल्याने ते सुखावले आहेत. 

एकूण घरकुल प्रकल्प 
६९३ एकूण घरकुले 
२० कोटी रुपयांचा खर्च 
७०० कुटुंबांना लाभ 

कार्यकाळातील मोठा प्रकल्प 
महापौरपदाच्या कार्यकाळात सातशे कुटुंबांसाठी घरकुल प्रकल्प पूर्ण करता आले, ही खूप समाधानाची बाब अाहे. ज्या िकरकोळ अडचणी आहेत, त्या दूर करण्याचे काम सुरू आहे. घरकुल प्रकल्पांप्रमाणेच स्पर्धा परीक्षा केंद्र, बालिकाश्रम, कोठी केडगाव देवी रस्ते, रंगभवनचे नूतनीकरण, मूलभूत कामांसाठी २० कोटींचा निधी यासारखे अनेक मोठी कामे पूर्ण करता आली, याचे मोठे समाधान आहे.
- शीला शिंदे, माजी महापौर. 
बातम्या आणखी आहेत...