आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: शहरात घरफोडी करणाऱ्या दरोडेखोरांची टोळी जेरबंद, 7 जण ताब्‍यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दरोडा टाकण्यासाठी भिस्तबाग महालात दबा धरून बसलेल्या सात दरोडेखोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शोखेच्या पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतले. आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु मोठ्या शिताफीने पाठलाग करत पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. भिस्तबाग महालाभोवती अंधारात सापळा लावून पोलिसांनी ही कारवाई केली. शहर उपनगरात केलेल्या अनेक घरफोड्यांची कबुली या आरोपींनी दिली.

 

सागर गोरख मांजरे (२० , उंडे वस्ती, मातापूर, श्रीरामपूर), शंकर संजय गायकवाड (२१ , उक्कलगाव, श्रीरामपूर), योगेश सावळेराम मांजरे (१९, उंडे वस्ती, मातापूर, श्रीरामपूर), अनिल सुरेश गायकवाड (१९, मातापूर चौक, श्रीरामपूर), सतीश गोरख गायकवाड (२०, मराठी शाळेजवळ, उक्कलगाव, श्रीरामपूर), करण रामदास गायकवाड (१९ , बाजार तळाजवळ, पानेगाव, श्रीरामपूर) नाना बाळू गुंजाळ (२६, उक्कलगाव, श्रीरामपूर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. सावेडी उपनगरातील राधाकृष्णनगर जवळील भिस्तबाग महालात काही गुन्हेगार लपून बसलेले आहेत. त्यांनी महालाच्या बाजुला वाहने लावली असून तोंडाला कपडे बांधले आहेत. ते दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना खबऱ्यामार्फत मिळाली. पवार यांनी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा अप्पर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ आपले पथक महालाकडे रवाना केले. पथकातील पोलिसांनी महालाभोवती सापळा लावला. मात्र, पोलिसांची भनक लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मात्र मोठ्या शिताफीने पाठलाग करत सर्व आरोपींना ताब्यात घेतले.


त्यांच्याकडून घरफोडी दरोड्यासाठी लागणारे साहित्य, लोखंडी कटावणी, सुरा, गज कापण्यासाठी डाग पाना, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी पक्कड, मिरची पूड, तसेच दोन दुचाकी, मोबाइल असा एकूण एक लाख १३ हजार ६१० रुपयांचा ऐवज जप्त केला. अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेली विना क्रमांकाची पल्सर दुचाकी त्यांनी सावेडी परिसरातून चोरल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरिक्षक संदीप पाटील, डॉ. शरद गोर्डे, पोलिस हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, दत्तात्रय हिंगडे, उमेश खेडकर, पोलिस नाईक रावसाहेब हुसळे, संदीप घोडके, भागीनाथ पंचमुख, शंकर चौधरी, सचिन अडबल, दिलीप शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल योगेश सातपुते, संभाजी कोतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आरोपी सराईत गुन्हेगार
दोनमहिन्यांपूर्वी दत्त मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या बिशप लॉईड कॉलनीत घरफोडी केल्याची कबुली या सराईत आरोपींनी दिली. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांचे हे घर असून याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.

 

घरफोडीचे गुन्हे कमी होतील
पकडलेल्या दरोडेखोरांनी शहर उपनगरांमध्ये अनेक घरफोड्या केल्या आहेत. टोळीचे काही साथीदार यापूर्वीच अटक केले आहेत. जे फरार होते, ते नाशिक, श्रीरामपूर आदी ठिकाणी किरकोळ चोऱ्या करत होते. त्यामुळे या किरकोळ गुन्ह्यांची नोंद झालेली नाही. आता मात्र टोळीतील सर्वजण ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे शहर उपनगरातील घरफोडीचे गुन्हे कमी होण्यास मदत होईल.
- दिलीप पवार, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा.

 

टोळीप्रमुख वॉचमनची दुसरी टोळी
ज्याच्या भरवशावर लोक बिनबोभाट घराची, इमारतीची, कार्यालय, बांधकाम साईट्सच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवतात, असा एक वॉचमनच घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा टोळीप्रमुख असल्याचा धक्कादायक प्रकार सहा महिन्यांपूर्वी उघड झाला होता. गोरख मांजरे असे या वॉचमनचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या टोळीच्या मुसक्या अावळल्या होत्या. वॉचमनचे काम करत असताना आजुबाजूच्या घरांची रेकी करत घरफोडी करण्याची या टोळीची पध्दत होती. विशेष म्हणजे गोरखने स्वत:ची मुले काही साथीदारांसह ही टोळी तयार केली होती. पोलिसांनी गोरख याच्याससह तीन आरोपींना सहा महिन्यांपूर्वी ताब्यात घेतले होते. परंतु फरार झालेल्या टोळीतील काहींनी दुसरी टोळी तयार करून घरफोडीचे सत्र पुन्हा सुरू केले होते. स्थानिक गुन्हे शाखेने मात्र आता या टोळीच्याही मुसक्या आवळ्या आहेत. त्यामुळे शहर उपनगरातील घरफोडीचे गुन्हे कमी होण्यास मदत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...