आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा घरकुल योजनेद्वारे ७०० कुटुंबांचे पुनर्वसन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहराच्या प्रथम महिला महापौर शीला शिंदे यांच्या कार्यकाळात हाती घेण्यात आलेला सातशे घरांचा महत्त्वाकांक्षी घरकुल प्रकल्प पूर्ण झाला आहे. शिंदे यांनी स्वत: वैयक्तिक पातळीवर या प्रकल्पाकडे लक्ष दिले होते. तब्बल २० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाद्वारे झोपडपट्टीत राहणाऱ्या सातशे कुटंुबांचे पुनर्वसन होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (२२ मार्च) या घरकुलांचे लोकार्पण करण्यात येईल.

स्वत:चे घर हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय, परंतु घर बांधणे अथवा ते विकत घेणे सर्वांनाच शक्य होत नाही. वाढलेली महागाई, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आजारपण अशा एक ना अनेक कारणांमुळे अनेकांचे घराचे स्वप्न शेवटपर्यंत स्वप्नच राहते. महापालिकेने मात्र तब्बल सातशे कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण केले, तेदेखील अगदी मोफत. या घरकुल योजनेअंतर्गत सातशे घरांच्या तीन प्रकल्पांचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.
केंद्र राज्य शासनाची एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना रमाई आवास योजनेअंतर्गत महापालिकेने दोन वर्षांपूर्वी घरकुलांचे तीन प्रकल्प हाती घेतले होते. वारुळाचा मारुती परिसरात २५२ ११३ घरकुलांचे दोन काटवन खंडोबा परिसरात ३७२ घरकुलांचा एक अशा तीन प्रकल्पांचे काम आता पूर्ण झाले आहे. केंद्र राज्य शासनाकडून उपलब्ध झालेल्या २० कोटी रुपयांच्या निधीतून हे प्रकल्प उभे राहिले. महापालिका लाभार्थींची त्यात केवळ दहा टक्के रक्कम आहे. प्रत्येक कुटुंबाला २६९ चौरस फुटांचे सर्व सोयी-सुविधा असलेले प्रशस्त घर उपलब्ध झाले आहे.

माजी महापौर शीला शिंदे यांच्या कार्यकाळात घरकुलांचे हे महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू करण्यात आले. त्यांनी स्वत: या कामात लक्ष घातले. वेळोवेळी बैठका घेऊन, तसेच प्रत्यक्ष कामाची पाहणी करून लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आज त्यांच्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या मंगळवारी घरकुलांचे लोकार्पण होणार आहे.

कार्यकाळातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प
महापौरपदाच्या कार्यकाळात हाती घेतलेला घरकुल प्रकल्प महत्त्वाकांक्षी होता. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी केंद्र राज्य शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा केला. प्रत्यक्षात काम सुरू झाल्यावर दिवसातून एकदा स्वत: साइट व्हिजिट केली. कामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वेळाेवेळी बैठका घेतल्या. झोपडपट्टीत राहणाऱ्या गरजूंना चांगली घरे उपलब्ध व्हावीत हाच त्यामागचा हेतू होता. महापौरपदाच्या कार्यकाळातच हे प्रकल्प उभे राहिले होते, पाण्याची लाइन, रस्ते, लाइटची कामे अपूर्ण होती ती पूर्ण झाली. आपल्या कार्यकाळात सुरू झालेला प्रकल्प पूर्णत्वास आला. शीला शिंदे, माजी महापौर.

शहरापासून हाकेच्या अंतरावर
घरकुलांच्या तिन्ही प्रकल्पांमध्ये लाभार्थींना केवळ घरेच मिळणार नाहीत, तर अंतर्गत रस्ते, ड्रेनेजलाइन, संरक्षक भिंत, पथदिवे, उद्यान अशा अनेक सुविधाही मिळणार आहेत. विशेष म्हणजे या प्रकल्पांच्या परिसरात लाभार्थींसाठी समाजमंदिरही उभारण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रकल्प म्हणजे शहरातील एखाद्या मोठ्या खासगी गृहप्रकल्पांप्रमाणेच आहेत. शिवाय मध्यवर्ती शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावरच हे प्रकल्प आहेत.

१६० लाभार्थींचा लकी ड्रॉ
काटवन खंडोबा येथील महात्मा फुले वसाहतीमधील ३७२ पैकी १६० घरकुलांच्या लाभार्थींचा लकी ड्रॉ काढण्यात आला आहे. उर्वरित घरकुलांच्या लाभार्थींनादेखील लवकरच घरकुलांचे वाटप होईल. वारुळाचा मारुती येथील प्रकल्पही पूर्ण झाले आहेत. सर्व लाभार्थींना लवकरच त्यांची हक्काची घरे मिळतील. आर. जी. मेहेत्रे, प्रकल्प अभियंता.
बातम्या आणखी आहेत...