आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

७२ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन दुष्काळग्रस्तांसाठी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्यभर दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे, हे लक्षात घेऊन महापालिकेतील सर्व ७२ नगरसेवकांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे करण्याचा निर्णय घेतला. आपले एक महिन्याचे मानधन दुष्काळग्रस्तांना देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या सभेत नगरसेवकांनी घेतला. दुष्काळग्रस्तांना मदत करणारी नगर महापालिका राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे.

महापौर अभिषेक कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत नगरसेवक उमेश कवडे यांनी दुष्काळग्रस्तांचा विषय उपस्थित केला. दुष्काळी स्थिती गंभीर झाली आहे. शासनाकडून दुष्काळग्रस्तांना मदत सुरू आहे, परंतु आपणही सामाजिक बांधिलकी जपत काहीतरी मदत दिली पाहिजे. त्यासाठी सर्व नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून द्यावे, असा ठराव कवडे यांनी मांडला. या ठरावाचे महापौर कळमकर यांच्यासह सर्व सत्ताधारी विरोधी नगरसेवकांनी स्वागत केले. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी ठरावास अनुमोदन दिले. सर्व नगरसेवकांनी त्वरित मानधन देण्याची तयारी दर्शवली. महापालिकेत सध्या ७२ नगरसेवक आहेत. प्रत्येक नगरसेवकाला दरमहा साडेसात हजार रुपये मानधन मिळते. सर्व नगरसेवकांचे मिळून सुमारे लाख ४७ हजार रुपये होतात. ही रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी काम करणाऱ्या नाम संस्थेला देण्यात यावी, असा ठराव मंजूर करण्यात आला. अभिनेते नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांनी ही संस्था सुरू केली असून या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी मदत दिली जाते. नगरसेवकांनी या संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला. दुष्काळग्रस्तांना मदत करणारी नगर ही राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे. नगरसेवकांच्या या मदतीमुळे दुष्काळग्रस्तांना हातभार तर लागेलच, शिवाय महापालिकेचे नाव राज्यपातळीवर जाणार आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या या स्तुत्य निर्णयाचे नगरसह राज्यभरातून स्वागत होणार आहे.

राज्यातील इतर महापालिकांसमोर आदर्श
दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यांच्या मदतीसाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठी नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन दुष्काळग्रस्तांना देण्याचा प्रस्ताव ठेवला. विशेष म्हणजे सर्व नगरसेवकांनी या ठरावाचे स्वागत करत मानधन देण्याची तयारी दाखवली, ही अभिमानाची बाब आहे. राज्यातील इतर महापालिकांनी हा आदर्श घेऊन दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. उमेश कवडे, नगरसेवक.
बातम्या आणखी आहेत...