आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळा धरणात झाला ७७ टक्के पाणीसाठा, भंडारदरा धरण ९५ टक्के भरले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडारदरा - भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील रतनवाडी येथे २४ तासांत पुन्हा ३३३७ मिलिमीटर म्हणजे सव्वा तेरा इंच पावसाची नोंद झाली. रात्री मुळा धरणात ७७, तर भंडारदरा धरणात ९५ टक्के पाणीसाठा झाला. अतिवृष्टीमुळे धरणांत पाणी वेगात वाढत आहे, मात्र आदिवासी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसानाकडे प्रशासनाचे लक्ष नाही. भंडारदरा मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील सुमारे २५ गावांत प्रचंड नुकसान झाले आहे. भातशेती जवळजवळ नष्ट झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे पशुधन दगावले आहे. त्याचबरोबर गोदावरीला आलेल्या पुरामुळे नदीलगतच्या गावांतही प्रचंड नुकसान झाले आहे.
भंडारदरा बुधवारी रात्री धरणाचा पाणीसाठा ९५ टक्के झाला होता. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने दिवसभरात सुमारे २०० दशलक्ष घनफूट पाण्याची वाढ झाली. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्याने सायंकाळी सहा वाजता दहा हजार १०० दशलक्ष घनफुटांचा टप्पा पार केला. दहा हजार पाचशे दशलक्ष घनफुटांची पातळी कायम ठेवून अतिरिक्त पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपअभियंता जी. बी. थोरात यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत ६४.५४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मात्र अद्याप पावसाचा जोर कायम असल्याने रात्री दहाच्या सुमारास धरणाने २० हजार दशलक्ष घनफुटांचा टप्पा पार केला होता. सकाळी धरणात २१ हजार दशलक्ष घनफुटाच्या दरम्यान पाणीसाठा होणार आहे. कारण रात्री नऊच्या दरम्यान मुळा नदीचा कोतूळजवळ विसर्ग ४० हजार क्युसेकच्या दरम्यान होता. मुळा धरण ७७, तर भंडारदरा धरण ९५ टक्के भरले आहे.
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्यात खूप वेगाने वाढ झाली. बुधवारी मात्र पावसाचा जोर कमी झाला आहे, तरीही दिवसभरात रतनवाडी, घाटघर, साम्रद, पांजरे भागात होत असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरूच होती. या धरणातून गुरुवारी दुपारपर्यंत १० हजार पाचशे घनफुटांचा पाणीसाठा होऊन पाणी सोडले जाण्याची शक्यता थोरात यांनी व्यक्त केली. पाच ऑगस्टपर्यंतच धरण तांत्रिकदृष्ट्या भरण्याची वेळ १६ वर्षांनी आली आहे.

प्रवरेची उपनदी असलेल्या कृष्णवंती नदीचे विद्युतगृहासाठी सोडलेले पाणी, रंधा धबधबा, ओढे नाले मिळून १३ हजार क्युसेकने निळवंडे धरणात जात आहे. त्यामुळे निळवंडे धरणात ४७३० दशलक्ष घनपूट पाणीसाठा झाला आहे. निळवंडे धरणात यावर्षी आठ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवले जाणार आहे.

अकोले तालुक्यातील आणखी एक महत्त्वाचे आढळा धरणही पूर्ण भरले आहे. आढळा धरणाचा पाणीसाठा १२०० दशलक्ष घनफूट झाला आहे. सांडव्यावरून ५० क्युसेकने पाणी सोडले जात आहे.

आदिवासींचे प्रचंड नुकसान
नोंदवलेला पाऊस, (कंसात एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये ) भंडारदरा : ६७ (१११३), घाटघर : २०५ (२७३३), पांजरे : २४७ (१८८७), रतनवाडी : ३३७ (२९०३), वाकी : १८० (१४५८)

पीकविम्याची रक्कम मिळेना
या परिसरातील सहकारी संस्थांद्वारे पीकविम्याचे हप्ते कापण्यात आले. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून एकदाही पीकविम्याची रक्कम मिळाली नसल्याची कैफियत आदिवासी शेतकऱ्यांनी मांडली. जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक भांगरे यांनी केली आहे.

कोलटेंभेत डोंगराचा भाग कोसळला
कोलटेंभे गावाला लागून असलेला डोंगराचा भुसभुशीत भाग कोसळून त्याखाली असलेली १५ शेतकऱ्यांची जमीन सपाट झाली आहे. मातीच्या भरावाखाली भातशेती दबली गेली आहे. वारंघुशी येथील शेतकऱ्याची ५५ हजारांची म्हैस दगावली. तेथील एका शेतकऱ्याचा बैलही मृत्यू पावला. शेतकऱ्यांना पशूधन घरात चाऱ्याविना उपाशी बांधावे लागत आहे, अशी माहिती घाटघरचे सामाजिक कार्यकर्ते धोंडिबा सोंगळ यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांना सर्वाधिक फटका बसला. घाटघर, साम्रद, रतनवाडी, शिंगणवाडी, मूरशेत, पांजरे, उडदावणे, लव्हाळवाडी, कोलटेंभे, मूतखेल या गावांतील भातशेती पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. शेतांचे बांध वाहून गेल्यानेे भाताच्या रोपांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे पशुधन दगावले आहे.

बातम्या आणखी आहेत...