आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 840 Farm Ponds Set Up All Over The State Order By Sugarcane Commissioner

साखर आयुक्तांचा आदेशाने राज्यात होणार 840 शेततळी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे - दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक साखर कारखान्याने पाच शेततळी तयार करावीत व पाच हजार लिटर क्षमतेच्या 30 सिंथेटिक टाक्या खरेदी करून प्रशासनाकडे द्याव्यात, असा आदेश राज्य साखर आयुक्तालयाने दिला आहे. त्यामुळे आता साखरसम्राटांच्या माध्यमातून राज्यभरात सुमारे 840 शेततळी तयार होणार असून जलसंधारणाच्या कामाला मोठा हातभार लागणार आहे

राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न चालू आहेत. यामध्ये आता साखर कारखानेही पुढे सरसावले आहेत. राज्याच्या साखर आयुक्तालयाने सर्व कारखान्यांना पाणीटंचाई निवारण्यासाठी विविध सूचना दिल्या आहेत. त्यात प्रत्येक कारखान्याने प्रशासनाला प्रत्येकी 30 सिंथेटिक टाक्या पुरवाव्यात, असा आदेश काढला होता. त्यानंतर दुष्काळ निवारणासाठी टनामागे 10 रुपयांप्रमाणे दुष्काळ निधीची मागणीही केली आहे. आता त्यापाठोपाठ प्रत्येक कारखान्याने पाच शेततळी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील 168 कारखान्यांमार्फत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एक चांगले काम उभे राहावे, यासाठी दुष्काळाने एक मोठी संधी निर्माण करून दिली आहे.

टंचाई परिस्थितीत कामगारांना रोजगार, जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात किमान पाच शेततळी तयार करावीत, अशी सूचना राज्य साखर आयुक्तालयाने सर्व साखर कारखान्यांना दिल्या आहेत. राज्यात 210 पैकी 168 साखर कारखान्यांचा गळीत हंगात या वर्षी चालू आहे. या सर्व कारखान्यांना शेततळी करावी लागणार आहेत.

सोनईतील मुळा कारखान्याच्या माध्यमातून नेहमीच कार्यक्षेत्रात कर्तव्य भावनेने विकासकामे केली जातात. 1972 च्या दुष्काळातही कारखान्याने दुष्काळ निवारणासाठी भरीव योगदान दिले होते. कारखाना कार्यक्षेत्रात शेततळी तयार केल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांसह कारखान्यालाही फायदा होणार आहे. त्यामुळे साखर आयुक्तांच्या सूचनेचे आमच्या कारखान्याकडून पालन करण्यात येणार आहे. लवकर शेततळी करण्यात येतील, अशी माहिती मुळा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दिली.

नगर जिल्ह्यात 85 शेततळी तयार होणार
नगर जिल्ह्यातील 21 साखर कारखान्यांपैकी 17 कारखाने चालू आहेत. या सर्व कारखान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येकी पाच शेततळी केली, तर जिल्ह्यात 85 व राज्यात 840 शेततळी तयार होणार आहेत.
प्रशासनासमोर शेततळ्यांसाठी जागेचा मोठा प्रश्न
प्रत्येक शेततळ्याला किमान अर्धा एकर जागा लागणार आहे. ही जागा कोण देणार हा मात्र मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकणार आहे, कारण कारखाना कार्यक्षेत्रात शेतजमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यासाठी स्वतंत्र निधी शासन देणार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.