आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारदरा 87 टक्के भरले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले - भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विर्शांती घेतल्याने धरणात येणार्‍या पाण्याची आवक मंदावली आहे. गुरुवारपर्यंत धरणात 87 टक्के साठा झाला आहे. येत्या आठवडाभरात धरण भरण्याची शक्यता आहे.

भंडारदरा धरणाची एकूण क्षमता 11 हजार 39 दशलक्ष घनफूट आहे. गुरुवारी 96 दशलक्ष घनफूट पाणी नव्याने आल्याने धरणात सध्या 9 हजार 584 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात सध्या उन-पावसाचा खेळ सुरू झाला असून कधी जोरदार र्शावणसरी कोसळत आहेत. परिणामी धरणात येणार्‍या पाण्याची आवकही कमी-जास्त होत आहे.

वाकी जलाशयावरील कृष्णावंती नदीचा विसर्ग सध्या 500 क्युसेक्स असल्याने निळवंडे धरणातील पाण्याचा साठा सध्या स्थिर आहे. धरणात सध्या 2 हजार 403 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.

पर्यटकांनी फिरवली पाठ

स्वातंत्र्यदिनानिमित्त सुटीचा आनंद घेण्यासाठी भंडारदरा व घाटघर परिसरात बुधवारी मोठी गर्दी होण्याची शक्यता होती. मात्र, यंदा पर्यटकांनी भंडारदर्‍याकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसले.

यंदा सुमारे 9 हजार पर्यटकांनी भंडारदर्‍यात आपली सुटी साजरी केल्याची माहिती राजूर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक कासार यांनी दिली. धरणाऐवजी पर्यटकांनी हरिश्चंद्रगडावर जाण्यास पसंती दिली.

गेल्या वर्षी 15 ऑगस्टला सुटीचा आनंद घेण्यासाठी सुमारे 50 हजार पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे यंदाही ही गर्दी कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने मोठी तयारी केली होती. पोलिसांची जादा कुमक मागवण्याबरोबरच चार विविध ठिकाणी चेकनाके उभारण्यात आले होते. मात्र, पर्यटकांनीच धरणाकडे पाठ फिरवल्याने पोलिसही निर्धास्त झाले होते. रस्त्यावर तुरळक गर्दी होती. त्यामुळे प्रशासनाला फारसे कष्ट पडले नाहीत.

भंडारदरा परिसरात पावसाने घेतलेली विर्शांती, पूर्ण धरण भरलेले नसल्याने जलतुषार अंगावर घेऊन भिजण्याचा आनंद पर्यटकांना घेता आला नाही. धरणाकडे जाणार्‍या रस्त्यांची झालेली दुरवस्था आदी कारणांनीही पर्यटकांनी धरणाकडे पाठ फिरवल्याचे दिसते आहे. पर्यटकांनी पाठ फिरवल्याचा फटका स्थानिक व्यावसायिकांना बसला.