आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील 900 भूखंड झाले मनपाच्या मालकीचे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहरातील मिळकतींवर स्वत:चे नाव लावण्यासाठी महापालिका स्तरावर दोन वर्षांपासून कार्यवाही सुरू आहे. निवृत्त तहसीलदारांमार्फत हे काम सुरू असून आतापर्यंत 900 खुले भूखंड, तर 839 रस्त्यांच्या मिळकतींवर नावे लावण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. मनपाचे नाव लागल्याने मिळकतींचा विकास करता येणार आहे.

महापालिका मिळकतीच्या बहुतेक मालमत्तांवर गेल्या अनेक वर्षांपासून नावे लागलेली नाहीत. मात्र, या जागांचा शोध घेऊन त्यावर मनपाचे नाव लावण्यासाठी प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी निवृत्त तहसीलदारांची समिती स्थापन केली आहे. त्यांच्यामार्फत कागदपत्रांची जुळवाजुळव, सर्व्हे नंबरच्या मालमत्तेची पाहणी करणे, ताबा पावती करून त्याचा प्रस्ताव संबंधित तलाठय़ाकडे पाठवणे आदी कामे करण्यात येत आहेत. आतापर्यंत समितीने सुमारे 900 खुले भूखंड व इतर मालमत्ता तसेच 839 रस्त्यांच्या मिळकतींवर मनपाचे नाव लावले आहे. यात मंजूर रेखांकनातील सर्व्हे नंबर पैकी माळीवाडा, नालेगाव, चाहुराणा बुद्रूक, सावेडी, भिस्तबाग, केडगाव, बोल्हेगाव, नागापूर, भिंगार या उपनगरांतील भूखंड व मालमत्तांचा समावेश आहे. याशिवाय मनपाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी सुमारे 20 एकर जागा संपादित करण्यात आली होती. या जमिनी आतापर्यंत मूळ मालकांच्या नावावर होत्या. त्या जागेवर काही दिवसांपूर्वीच मनपाचे नाव लावण्यात प्रशासनाला यश आले आहे. भूमापन कार्यालयामार्फत सिटी सर्व्हे कार्यालयात जुनी नावे कमी होऊन मनपाचे नाव लागणार आहे. सिटी सर्व्हेत नोंदी लावण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत नोंदी लावण्याची कार्यवाही करता येणार नाही. कागदपत्रांची पूर्तता झाल्यास तातडीने सिटी सर्व्हेत नोंदी लावल्या जातील, असे भूमापन अधिकारी भगवान शिंदे यांनी सांगितले.

टिपी तीन व चारची कामे प्रलंबित
1965 मध्ये मंजूर झालेल्या नगररचना योजना क्रमांक तीन व चारमधील मंजूर रेखांकनात समाविष्ट असलेल्या सारसनगर, बुरूडगाव रोड आदी भागांतील प्रकरणे सिटी सर्व्हेत नोंदी लावण्यासाठी एक वर्षापूर्वी नगर भूमापनकडे पाठवली आहेत. परंतु, अद्यापि या मालमत्तांची नोंद मनपाच्या नावावर लागली नाही.