आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खामगाव बाजार समितीसाठी ९५.३४ टक्क्यांवर मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव - जिल्ह्यातील सर्वात मोठ्या, कोट्यवधींची आर्थिक उलाढाल असलेल्या संवेदनशील असलेल्या खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकपदाच्या निवडीसाठी रविवार, २८ जून रोजी एकूण १५ केंद्रावर सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. या दरम्यान दोन हजार ९८७ मतदारांपैकी दोन हजार ८४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, यानुसार ९५.३४ टक्के मतदान झाले. मतपेटीत ४७ उमेदवारांचे भाग्य बंद झाले असून, बाजार समितीवर कोणाची सत्ता येणार, याबाबतची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.

या वेळी प्रथमच बाजार समितीची निवडणुक आमदार पांडुरंग फुंडकर, आमदार अॅड. आकाश फुंडकर आणि माजी आमदार दिलीप सानंदा यांनी प्रतिष्ठेची केली आहे. आपल्या पॅनलचे ऊमेदवार निवडून आणण्यासाठी या नेत्यांनी दिवस-रात्र एक करून मतदारांच्या घरापर्यंत जाऊन त्याचे मन आपल्या पॅनलच्या उमेदवारांच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला आहे. काही मतदारांना सहलीवर पाठवले होते. ते मतदार रविवारी आपापल्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले.

खामगाव शहरातील तीन ग्रामीण भागातील सुटाळा बुद्रूक, लाेखंडा, पिंपळगावराजा, रोहणा, गणेशपूर, लाखनवाडा बुद्रूक, अटाळी, अडगाव,पळशी बुद्रूक अशा मतदान केंद्रावर मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार आकाश लिंगाडे यांनी काम पाहिलेे. दरम्यान, सोमवार, २९ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह मतदार आणि शेतकंसह नागरिकांनाही आता निवडणूक निकालाचे वेध लागले आहेत.

आज होणार मतमोजणी
कृषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल सोमवार, २९ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. येथील गो. से. महाविद्यायालयाच्या हॉलमध्ये सकाळी नऊ वाजतापासून १२ टेबलवर मतमोजणी करण्यात येणार आहे. सायंकाळपर्यंत संपूर्ण निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी मतपेट्या पोहोचल्या असून, तिथे सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

रिंगणात होते असे उमेदवार
बाजारसमितीच्या सेवा संस्था मतदारसंघासाठीच्या ११ जागांसाठी २९, ग्रामपंचायत मतदारसंघाच्या चार जागांसाठी ११, व्यापारी मतदारसंघातील जागांसाठी ४, हमाल-मापारी मतदारसंघाच्या एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात होते.

निकालाकडे लागले लक्ष
संचालकांच्या१८ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत सहकारी सेवा मतदारसंघात सर्वाधिक ९८. ७१ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक ग्राम सोसायट्या कोणाकडे आहेत, त्यावर अनेकांचे लक्ष केंद्रीत झाले आहेत. दुसरीकडे ग्रामपंचायत मतदारसंघातही ९६.७० टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक ग्रामपंचायती ज्यांच्याकडे आहेत, त्यांना मतदान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्ही मतदारसंघांच्या एकूण १८ पैकी १५ जागा आहेत.

मतदारसंघ मतदार मतदान टक्केवारी
व्यापारी मतदारसंघ - ७६७ ७२६ ९४.६५
हमाल मतदारसंघ - ७३३ ६७० ९१.४०
सेवा संस्था मतदारसंघ - ६९९ ६९० ९८.७१
ग्रामपंचायत मतदारसंघ - ७८८ ७६२ ९६.७०
बातम्या आणखी आहेत...