आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नगर- व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी गोळा करणाऱ्या, स्वत:च्या बंगल्याचे अतिक्रमण रस्त्यावर करणाऱ्या, बँकेतील घोटाळ्यांत अटक होऊ नये म्हणून पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याची नामुष्की झेलणाऱ्या 'चिंधी चोरा'ची शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर बोलण्याची लायकी आहे काय? स्थानिक राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाला पोसणारा दलाल, अशी संभावना करत माजी आमदार अनिल राठोड यांनी खासदार दिलीप गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर शनिवारी पत्रकार परिषदेत पलटवार केला.
खासदार गांधी यांनी शुक्रवारी शिवसेनेवर केलेल्या जोरदार टीकेनंतर शिवसेनेच्या वतीने टीकेला उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती. महापौर सुरेखा कदम, शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक सचिन जाधव, संजय शेंडगे, संभाजी कदम, विक्रम राठोड, गोविंद मोकाटे, दीपक खैरे, नितीन बारस्कर, सुरेश तिवारी, हर्षवर्धन कोतकर, योगीराज गाडे, सचिन शिंदे, व सचिन शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
गांधींचा एकेरी उल्लेख करत राठोड म्हणाले, "ज्याला केडगावच्या पोटनिवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराचे डिपॉझिट वाचवता आले नाही, त्याची शिवसेना पक्षप्रमुखांवर टीका करण्याची लायकी तरी आहे का? हा भाजपचा नाहीच. खरा भाजप आमच्या बरोबर आहे. हा राजकीय राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाला पोसणारा राजकीय दलाल आहे. स्वत:चा 'छिंदम गट' करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधणाऱ्या गद्दारांनी आमच्या पक्ष प्रमुखांवर बोलू नये.
गांधी यांचा उल्लेख खासदार न करता 'खावदार' असा करत ते म्हणाले, केडगावच्या घटनेनंतर २० दिवसांनी ते बोलले. पोपट आता कसा बोलू लागला? हा पोपट पिंजऱ्यात जाणार. केलेल्या कर्माचे फळे येथेच भोगावे लागणार आहेत. तुम्ही युती न करणारे कोण? उलट आम्हालाच तुमची युती नको आहे. तुम्ही तर 'सोधा' पक्षातील सावत्र व्याही आहात, असा आरोप त्यांनी केला. गांधी घराण्याचे नाव त्यांनी कलंकित केले. केडगाव येथील कोतकर व ठुबे कटुंबीयांना आतापर्यंत प्रत्येकी २२ लाखांची मदत करण्यात आली असून, अजून मदत देण्यात येणार आहे. शिवसेनेने या कुटुंबांची जबाबदारी घेतली आहे, असे त्यांनी नमूद केले.
विकासकामे होत नसल्याबद्दल गांधी यांनी आरोप केला होता, त्याला उत्तर देताना महापौर सुरेखा कदम म्हणाल्या, फेज २ च्या कामाला आम्ही गती दिली. हवे तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारा, असे आव्हान त्यांनी दिले.
'गांधी' हे तंबाखू शास्त्रज्ञ
पत्रकार परिषदेत दिलेल्या निवेदनात शिवसेनेने गांधी यांचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे. ज्याला स्वत:चा व कुटुंबाचा विकास करायचे माहिती आहे, त्यांनी आम्हाला विकासाचे धडे देऊ नयेत. तंबाखूने कँन्सर न होता पचन होते, असा अजब शोध लावणारे आपण स्वत:ला शास्त्रज्ञ म्हणून घेत आहे. तंबाखू लाॅबीकडून पैसे घेऊन त्यांनी आपला टीआरपी वाढवून घेतला आहे. ज्यांचे कुंकू पुसले त्यांचा विचार करता त्याची दखल न घेता व त्यांची विचारपूस न करता आपण जे कुंकू पुसतात त्यांचे समर्थन ते करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
स्वत:च्या पक्षातील साधे मंडलाध्यक्षसुध्दा आपले एेकत नाहीत. ही तर आपली लायकी आहे. खासदारकीच्या काळात चिनी बनावटीचे एलईडी लावण्यापलिकडे काहीच केले नाही. अनेकांना पेट्रोलपंप देतो, असे सांगून अनेकांना लाखो रुपये घेऊन लुबाडले आहे. रावसाहेब पटवर्धन पतसंस्था, भाई हिराचंद रायसोनी पतसंस्थांकडे कोट्यवधी रुपये थकवून आपण पतसंस्था बंद पाडल्या आहेत. केडगावची कोतकरांची भैरवनाथ पतसंस्था याला नेहमीच कर्ज देते, असाही आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
वाकचौरे यांच्यामुळे योजना मंजूर
केंद्र सरकारच्या नगर शहर व जिल्ह्यात ज्या योजना मंजूर झाल्या, त्या शिवसेनेचे तत्कालिन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यामुळे झाल्या. मंजूर योजनांची कागदपत्रे आपल्याकडे आहेत, असा दावा शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केला. आगामी निवडणुकीत गांधी निवडून येणार नाहीत. ते शिवसेनेमुळेच तीन वेळा खासदार झाले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उमेदवाराला वाऱ्यावर सोडले
ककेडगावमधील प्रभाग क्रमाक ३२ ब च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विशाल कोतकर याच्या फायद्यासाठी भारतीय जनता पक्षाने नवीन उमेदवार दिला होता. आपल्या उमेदवाराला वाऱ्यावर सोडून ते गेले. एकदाही प्रचार केला नाही. त्यांच्या उमेदवाराला केवळ १५४ मते मिळाली, अशी टीका शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी या वेळी खासदार गांधी यांच्यावर केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.