आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिशिंगणापूरला गुन्हेगारीची ‘साडेसाती’; भाविकांची लुटमार, अवैध धंद्यांतून मोठी उलाढाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुकाणे - जागतिक पातळीवर प्रसिध्दीस आलेले तालुक्यातील शिंगणापूर येथील शनी देवस्थान गेल्या काही वर्षांपासून अवैध धंदे, गुन्हेगारीच्या ‘साडेसाती’ने ग्रासले आहे. भाविकांची लुटमार, गुन्हेगारांच्या वाढत्या कारवायांमुळे प्रसिध्दीच्या उंचीवर पोहोचलेल्या देवस्थानच्या पावित्र्याला धक्का पोहचू पहात आहे.

 

वास्तवात केवळ पैशाच्या वारेमाप कमाईमुळे गुन्हेगारीचे केंद्रबिंदू ठरत असलेल्या या देवस्थानचे जागतिक पातळीवरचे महत्त्व कमी होऊ देता भाविकांना भयमुक्त वातावरण कायम राखण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची अाहे. त्यांना गुन्हेगारी कारवायांना आळा घालावा लागणार आहे. खास बाब म्हणून सरू केलेल्याे स्वतंत्र पोलिस ठाण्याने गावठी कट्ट्यांच्या उच्चाटनाची धडाकेबाज कारवाई केल्याने ‘दिव्याखाली अंधार’ अशी अवस्था झाली आहे. यासाठी राजकारण्यांनीही मतभेद बाजूला ठेवण्याची गरज आहे.

 

शनिशिंगणापुरात दोन दिवसांपूर्वी परत एकदा टोळीयुद्धाचा रक्तरंजित भडका उडून अनेक गुन्हे दाखल असलेल्या गणेश भुतकर याचा निर्घृण खून झाल्याने येथील गुन्हेगारी उग्रस्वरूप धारण करत असल्याचे उघड झाले आहे. शिंगणापूर येथे रोजच भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होत असतो. त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. या उलाढालीत पूजासाहित्य, खाद्यपेये, हॉटेल या व्यवसायाची तीव्र स्पर्धेतून गाड्यांना लटकणाऱ्यांच्या माध्यमातून होणारी लुटमार हे गु्न्हेगारी वाढण्याचे प्रमुख कारण दिसत आहे. त्याच्या बरोबरच मटका, दारू, अंमली पदार्थाचे व्यवसाय याला आणखी खतपाणी घालीत आहेत. विनाकष्ट मुबलक पैसा मिळत असल्याने येथे अनेक ‘दादा’ निर्माण होत आहेत. ते सामान्यांवर दहशत पसरवत असल्याच्या तक्रारी आहेत. स्वत:च्या गटाचे वर्चस्व राखण्यासाठी अशा दादांनी राजाश्रयाने सशस्त्र टोळ्या तयार केल्याचे वास्तव आहे.

 

गावठी कट्ट्यांच्या सर्रास खुलेआम वापरासाठी जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या शनिशिंगणापूरची दुसरी वेगळी ओळख निर्माण होणे तालुक्याच्या दृष्टीने हितावह नाही. क्षुल्लक क्षुल्लक कारणांवरूनही गावठी कट्ट्यांतून गोळीबार करून दहशत पसरवण्याचे प्रकार वारंवार घडू लागल्याने त्याची कधी-कधी भाविकांना झळ बसत असल्याने त्याचा दुरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या बोटचेपे भूमिकेने शिंगणापूर येथे अवैध धंदे गुन्हेगारीची पाळेमुळे खोलवर रुजली जात असल्याचे वारंवार दिसून आले आहे. शनिशिंगणापूरचे धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक पातळीवर वाढलेले महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाने एक-दीड वर्षापूर्वी येथे स्वतंत्र पोलिस ठाणे उभारले. मात्र, यामुळे भाविकांच्या लुटमारीसह अवैध धंदे त्या माध्यमातून पोसलेल्या गुन्हेगारीला आळा बसण्याऐवजी अधिकच वाढल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

 

देवस्थानच्या महतीमुळे वाढलेल्या व्यावसायांनी जर थोडीशी समजंस भुमिका घेऊन भाविकांना योग्य वागणूक देऊन उचित व्यवहार केला, तर येणारा काळ त्यांना देवस्थानला आणखी उज्वल ठरण्यास वेळ लागणार नाही. येथील व्यावसायिक जागांना मोठ्या प्रमाणात भरमसाठ भाडे आकारले जाते. त्यामुळे पैसा वसूल करण्याच्या नादात भाडेकरूंंचे उलटसुलट उद्योग निमूटपणे पाहण्याशिवाय ग्रामस्थांच्या हातात काही नसल्याने येथेच या सर्व दुष्टचक्राचे मूळ असल्याचे जाणवते.


ग्रामस्थांनी इच्छाशक्ती दाखवल्यास गुन्हेगारीला आळा
देवस्थानच्या विकासाबरोबरच ग्रामस्थांनी स्वत:च्या आर्थिक प्रगतीसाठी या जगप्रसिद्ध देवस्थानच्या लौकिकास बाधा येऊ द्यायची किंवा नाही याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. गाव देवस्थानच्या हितासाठी सर्वांनीच विविध मतभेदांचे जोडे बाजूला काढून एकत्र येण्याची इच्छाशक्ती दाखवल्यास गुन्हेगारीला आळा बसू शकतो.

बातम्या आणखी आहेत...