आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता नाचायचं नाही शिकायचं; कोल्हाटी समाजाच्या प्रबोधन मेळाव्यात निर्धार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी- यापुढे संगीत बारीमधून कोल्हाटी समाजातील महिला व मुली नाचगाणे करणार नाहीत, असा ठराव शुक्रवारी समाजाच्या मढी येथील प्रबोधन मेळाव्यात घेण्यात आला.  जात पंचायतीऐवजी प्रबोधन मेळावा मढीत झाला. मानाचा नारळ फोडण्याचा मान यंदा मानकऱ्यांबरोबरच महिलेला देण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य राखत कोल्हाटी समाजाने स्त्रियांचा सन्मान केला.  


जात पंचायतीनिमित्त विखुरलेला समाज एकत्र येत होता. मात्र पूर्वापार चालत आलेली ही पद्धत बंद पडल्याने समाजातील संवाद संपू नये, म्हणून प्रबोधन मेळावा घेण्याचा निर्णय पंच मंडळाने घेतला. शिक्षण, आरोग्य, रोजगार, विवाह, नातीगोती, सामाजिक संकटे अशा विविध मुद्द्यांवर प्रबोधन मेळाव्यात चर्चा झाली.   


मढी, सोनारी, जेजुरी व माळेगाव येथे जात पंचायतीऐवजी प्रबोधन मेळावे घेऊन सामाजिक ऐक्य व संवाद संघशक्तीचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी कोल्हाटी बांधव सरसावले आहेत. विविध कला केंद्र, संगीत बारी, विवाह यात्रा-जत्रा उरुसामधून नाचगाणे करत मनोरंजन करणाऱ्या महिला प्रामुख्याने कोल्हाटी समाजाच्या असतात. नाच-गाण्यांची परंपरा देवादिकांसह राजे- महाराजांपासून सुरू असून आम्हीसुद्धा सेवा करतो, अशी या समाजाची भावना.   


यंदा प्रथमच महिलासुद्धा चर्चेत सहभागी झाल्या. आठवड (ता. नगर) या गावाला मानाचे नारळ फोडण्याचा अधिकार. तो त्यांना देत महिलेच्या हस्तेही मानाचा नारळ फोडण्यात आला. अॅड. अरुण जाधव, राम अंधारे, बाळासाहेब काळे, अरुण मुसळे, सचिन जाधव, विशाल अंधारे, शरद काळे, विजय काळे, समाधान अंधारे, रवी बागल, संजीवनी जाधव, माधुरी काळे, लता जाधव यांच्यासह राज्याच्या विविध भागांतील कोल्हाटी बांधव मेळाव्यास उपस्थित होते.   


अॅड. जाधव म्हणाले, ‘‘आता नाचायचं नाही; शिकायचं, अधिकारी-पदाधिकारी व्हायचं असा निर्धार करत नाच-गाण्याला मूठमाती देण्याबाबत सर्वच समाजबांधव आग्रही अाहेत. ज्या महिला या व्यवसायात स्थिरावल्या, त्यांना आता पर्याय नाही, पण ज्या नव्याने या व्यवसायात ढकलल्या जातील, नाचगाणे करू इच्छित असतील, त्यांना बंदी घालून शिक्षणाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्य समाज इंग्रजी भाषा बोलताहेत, संगणकावर कामकाज करतात. आम्ही कुठपर्यंत ढोलकी अन् घुंगराच्या तालावर दमायचं, अशी महिलांची भूमिका समाजाला पटली.’   

बातम्या आणखी आहेत...