आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी विद्यापीठाचे कांदा बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी शहर- कांद्याचे बियाणे खरेदीसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांतून आलेल्या शेतकऱ्यांची झुंबड उडाल्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली. शेतकऱ्यांचा गोंधळ थांबवण्यासाठी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डाॅ. किरण कोकाटे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. 


कृषी विद्यापीठात तयार झालेल्या दर्जेदार कांदा बियाणास संपूर्ण राज्यातून मागणी आहे. सोमवारी विद्यापीठाच्या बी-बियाणे केंद्रावर कांद्याचे फुले समर्थ व फुले बसवंत हे बियाणे उपलब्ध झाल्याने नगरसह नाशिक जिल्ह्यातील कानडगाव भारडी, चोंडी, गोयेगाव, चांदवड येथील हजारो शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. हजारो शेतकरी एकाच वेळी केंद्रावर जमल्याने गोंधळ उडाला. 


काही शेतकऱ्यांनी रांग सोडून मध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याने आरडाओरड होऊन वातावरण तणावपूर्ण बनले होते. हा गोंधळ थांबवण्यासाठी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी प्रयत्न केला. मात्र, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची उच्चांकी गर्दी असल्याने सुरक्षा विभागावर मर्यादा आल्या. ही माहिती मिळताच डाॅ. कोकाटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांना शांततेत बियाणे खरेदीचे आवाहन केले. त्यामुळे तब्बल २ तास सुरू असलेला गोंधळ थांबण्यास मदत झाली. सर्वांना बियाणे उपलब्ध होईल, अशा सूचना डॉ. कोकाटे यांनी बियाणे केंद्रातील अधिकाऱ्यांना केल्या. दुपारनंतर बियाणे खरेदी सुरळीत झाली. शांततेत बियाणे वाटप होण्यासाठी सुरक्षा अधिकारी शेटे व सुरक्षा रक्षक बियाणे केंद्रावर ठाण मांडून होते. विद्यापीठात एकूण १० टन ६०० किलो कांदा बियाणे उपलब्ध होते. यामध्ये फुले समर्थ ७ टन ५०० किलो, तर फुले बसवंत ३ टन १०० किलोंचा समावेश होता. 


एकरी दीड लाख उत्पन्न 
कृषी विद्यापीठाचे कांदा बियाणे रोगाला बळी पडत नाही. हे बियाणे दर्जेदार असून पावसाळ्यात एकरी १०० क्विंटल उत्पादन मिळते. या कांद्याला चांगला बाजारभाव मिळतो. कांदा बियाणे, लागवड, खते, काढणी, औषध फवारणी, वाहतूक, काढणी यासाठी एकरी ४० हजार रुपये खर्च येतो. पावसाळी कांद्याला १२ ते १५ रुपये किलो भाव मिळाल्यास साडेतीन महिन्यांत येणाऱ्या कांदा पिकातून दीड लाखाचे उत्पन्न मिळते.
- भगवान तुळशीराम भालनोर, शेतकरी, कुंदलगाव, ता. चांदवड, नाशिक

बातम्या आणखी आहेत...