आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा दूध संघाच्या जागा विक्रीत कोट्यवधींचा घोटाळा; रोहिदास कर्डिले यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळकी- जिल्हा दूध उत्पादक संघाची सावेडी रस्त्यावर गरूड हॉस्पिटलशेजारी ८ हजार २६१ चौरस मीटर जागा आहे. या जागेची विक्री ९ फेब्रुवारीला निविदा काढून करण्यात आली. साई मिडास रियालीटीज अहमदनगर यांनी ही जागा २७ कोटी ११ लाखांना विकत घेतली. या व्यवहारात संगनमताने कोट्यवधींचा घोटाळा झाला. साई मिडासला निविदेतील अटी, शर्तींमध्ये बदल करत मोठी सवलत देत ३२ कोटींपेक्षा जास्त किमतीची जागा २७ कोटींना विकली गेली. जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्था आणि शेतकरी, सभासदांची मोठी फसवणूक झाली, असा आरोप बाणेश्वर दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रोहिदास कर्डिले यांनी केला. या व्यवहाराविरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. 


कर्डिले म्हणाले, जिल्हा दूध संघाची सर्व्हे नं १६१/१ मधील प्लॉट नं ४४ मध्ये ६६०५.२ चौमी, प्लॉट नं ४४ / १ मध्ये १३६६.७ आणि प्लॉट नं ४३ मध्ये २८९.२ चौमी जागा आहे. या जागेत नगर, श्रीगोंदे, कर्जत , पारनेर, पाथर्डी, जामखेड आणि शेवगाव तालुका दूध संघाचा हिस्सा आहे. या जागेचा लिलाव १७ नोव्हेंबर २०१७ रोजी करण्याचा प्रयत्न झाला, पण अपेक्षित किंमत न आल्याने लिलाव रद्द करण्यात आला. 

 

फेरलिलावासाठी २२ जानेवारीला जाहिरात देण्यात येऊन निविदा मागवण्यात आल्या. व्यंकटेश डेव्हलपर्स - २४ कोटी ३ लाख, संत नागेबाबा मल्टीस्टेट - २२ कोटी २२ लाख २२ हजार आणि साई मिडीस रियालीटीज यांनी २४ कोटी २१ लाख ११ हजार बोलीच्या निविदा दाखल केल्या. विक्री योग्य किंमत २६ कोटी ६० लाख ९० हजार रूपये न आल्याने ९ फेब्रुवारीला सहायक सहनिबंधक, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निविदाधारकांना बोली वाढवण्याची संधी देण्यात आली. साई मिडासने तिसऱ्या बोलीत २७ कोटी ११ लाखांची बोली लावल्याने त्यांना जागा देण्यात आली. ही बोली संगनमताने वाढवल्याचा केल्याचा आरोप कर्डिले यांनी केला. लिलावानंतर अटी, शर्तींप्रमाणे २५ टक्के रक्कम तत्काळ भरावी आणि उर्वरित रक्कम ३० दिवसांच्या आत भरावी, असे अपेक्षीत असताना अटी, शर्तीत नंतर अनेक बदल करण्यात आले. २५ टक्के रकमेसाठी आठ दिवस आणि ५० टक्के रक्कम ९० दिवस व उर्वरित रक्कम १८० दिवसांत भरण्यात यावी, असा बदल करण्यात आला. यावर मिडासने १६ फेब्रुवारीला मुदत संपण्याच्या अखेरच्या दिवशी २५ टक्के रकमेचा ४ कोटी ७७ लाख ७५ हजारांचा धनादेश सहउपनिबंधकांना दिला. हे पैसे २० फेब्रुवारीला म्हणजे १२ व्या दिवशी जमा झाले. मिडासने उपनिबंधकांना १६ फेब्रुवारीला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, उर्वरित ७५ टक्के रकमेस सहा महिन्यांची मुदत देण्यात येईल, असे आपले ठरले आहे. त्यामुळे आम्ही जागेची किंमत वाढवली. यावरून हा सर्व व्यवहार ठरवून करण्यात आला आहे हे दिसते. 


जर सर्वच निविदाधारकांना अशी मुदत दिली असती, तर या जागेची किंमत अजून वाढली असती. निविदेत अपेक्षित किंमतीचा कोठेही उल्लेख नाही. त्यामुळेही जागेची बोली कमी लावण्यात आली. या जागेची बाजारातील किंमत ३२ कोटींपेक्षा जास्त आहे. असे असतानाही निविदेत अपेक्षित किमतीचा उल्लेख न करणे, अटी-शर्तींमध्ये वाटेल तसे बदल करणे या बाबी संशयास्पद आहेत. या व्यवहारात मोठा आर्थिक घोटाळा झाला असून त्या घोटाळयात सहायक उपनिबंधकासह लिलाव सभेसाठी उपस्थित सर्वच सहभागी आहेत. या गैरव्यवहारामुळे जिल्हा दूध संघाचे कर्मचारी, दूध उत्पादक संस्था, दूध उत्पादक शेतकरी यांचा मोठा तोटा झाला आहे. याविरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचेही कर्डिले यांनी सांगितले. 


अटी आणि शर्तीत बेकायदेशीर बदल 
जाहिरातीत अपेक्षित रकमेचा कोठेही उल्लेख नाही. त्यामुळे कमी किमतीच्या निविदा दाखल झाल्या. लिलाव झाल्यानंतर अटी, शर्तीत बदल करता येत नाहीत. बेकायदेशीर बदल करत मिडासला सवलत देण्यात आली. या जागेची बाजारातील किंमत ३२ कोटींपेक्षा जास्त आहे. या जागाविक्रीत कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे, असे कर्डिले म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...