आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंध गायिका गौरीच्या शिक्षणासाठी सरसावले मदतीचे अनेक हात...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- पारनेर तालुक्यातील पानोली येथील अंध विद्यार्थिनी गौरी इंगळे हिच्या आवाजाची जादू काही आगळीच आहे. 'स्वागत अहमदनगर'च्या वतीने फराह बख्क्ष महालात आयोजित हेरिटेज वॉक उपक्रमात गौरीच्या कलागुणांचा परिचय रसिकांना झाला. अनेकांनी लगेच तिला मदतीचा हात पुढे केला. 


गौरीची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. बालपणीच वडिलांचे छत्र हरपले. शालेय शिक्षण घेत असतानाच तिने संगीत शिकून घेतले. तिचे गाणे ऐकताना कुणीही भावविभोर झाल्याशिवाय रहात नाही. 'स्वागत अहमदनगर'च्या हेरिटेज वॉक उपक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक पोपट धामणे यांनी गौरीची ओळख करून देत तिला गाणे म्हणायला सांगितले. तिने सुरेल आवाजात गवळण सादर केली. अशा गुणी गायिकेला पुढे जाण्यासाठी रसिकांच्या मदतीची गरज आहे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना करताच अनेकांनी तिला साहाय्य करण्याची इच्छा दर्शवली. महापौर सुरेखा कदम यांनी तातडीने पाच हजार रूपयांची मदत जाहीर केली. नगरसेविका मनीषा काळे-बारस्कर व सीए राजेंद्र काळे यांनी संगीत शिक्षणासाठी येणारा सर्व आर्थिक भार उचलण्याचे जाहीर केले. 


या कार्यक्रमात नगर तालुक्यातील सारोळा बद्दी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गाणी सादर केली. साक्षी डहाणे, श्रेया रणखांब, प्रांजल इंगळे, कार्तिकी डाडर या मुलींनी हिमालयाशी सांगत नाते, सह्यगिरीचे कडे, जय महाराष्ट्र हे समूह गीत सादर केले. कार्तिकीने अभंग व सरगम गीत म्हटले. प्रांजलने वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगणारे गीत गात पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. ब्रह्मवीणा वादक मधुकर चौधरी यांनी टाळ बोले चिपळीला, तर डॉ. शिरीष कुलकर्णी यांनी अबीर गुलाल उधळीत रंग ही रचना सादर केली. हार्मोनिअमची साथसंगत पोपट धामणे यांनी, तर तबल्याची साथ पवन उनवणे यांनी केली. कालिदास इंगळे व दीपक उनवणे यांनी टाळवादन केले. महापौर सुरेख कदम, महापालिकेतील विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, शिवसेनेचे संभाजी कदम, नगरसेविका मनीषा काळे-बारस्कर यांच्यासह अनेकांनी कलावंतांचे भरभरून कौतुक करत त्यांच्या गाण्यांना दिलखुलास दाद दिली. 

बातम्या आणखी आहेत...