आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत जागा उपलब्ध न केल्यास तुरुंगात आंदोलन! अण्णा हजारे यांचे पंतप्रधानांना पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर २३ मार्चपासून दिल्लीत सुरू होणाऱ्या जनआंदोलनासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली. जागा न मिळाल्यास तुरुंगात आंदोलन करण्याचा इशाराही अण्णांनी दिला आहे.  


पत्रात हजारे यांनी म्हटले आहे, ‘आम्ही ७ नोव्हेंबर २०१७ पासून आतापर्यंत १२ वेळा पत्रव्यवहार केला. दिल्लीतील पोलिस आयुक्त, दिल्ली महापालिकेच्या सहायक संचालक अशा सर्व संबंधितांना वेळोवेळी पत्रे पाठवली, त्याचबरोबर प्रत्यक्ष भेट आणि चर्चादेखील केली. तथापि, आतापर्यंत कुठेही जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.   शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल, लोकायुक्त आणि अनेक लोकांच्या हिताच्या मुद्द्यांबाबत मी आतापर्यंत ४३ वेळा पत्र लिहिले, पण अजून काही उत्तर मिळाले नाही. म्हणूनच आता मी घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे आंदोलन करण्याचा  निर्णय घेतला आहे. वास्तविक घटनेनुसार, शांततापूर्ण आणि अहिंसात्मक मार्गाने होणाऱ्या आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून देण्याची सरकारची जबाबदारी आहे. पण सरकारच्या वतीने जागेची परवानगी अजून मिळालेली  नाही. त्यामुळे आता नाइलाजाने तुरुंगात आंदोलन करावे लागेल असे वाटत असले, तरी  लोकतंत्रासाठी हे योग्य नाही. मी ३० वर्षे जनतेच्या हितासाठी, राज्य आणि देशासाठी आंदोलन करत आलो आहे. आजपर्यंत कधीही हिंसक मार्गाने आंदोलन केले नाही. माझ्या जीवनात महात्मा गांधींच्या विचारांचा आदर्श आहे. त्या आदर्शाला तडा जाऊ न देण्याची सरकारची  जबाबदारी आहे. देशभरातून, सर्व  प्रांतांतून जनता या आंदोलनासाठी दिल्लीला येणार आहे. अशा स्थितीत आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून न देण्याची सरकारची भूमिका योग्य नाही,’  असे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...