आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या तपासावर न्यायाधीशांचे प्रश्नचिन्ह, आमदार जगतापच्या कोठडीत पुन्हा 3 दिवसांची वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपींच्या चौकशीसाठी तुम्हाला आठ दिवस दिले. तपासातून काय निष्पन्न झाले, असा सवाल दिवाणी न्यायाधीश एस. एस. पाटील यांनी पोलिसांसमोर उपस्थित केला. दरम्यान, तपासी अधिकारी दिलीप पवार व सरकारी वकील सीमा देशपांडे यांच्या युक्तिवादानंतर मुख्य आरोपी संदीप गुंजाळ व बाबासाहेब केदार यांना १९ एप्रिलपर्यंत, तर आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर, भानुदास कोतकर ऊर्फ बीएम यांना १८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. हत्याकांडातील आरोपी संदीप गिऱ्हे व पप्पू मोकळे यांना न्यायालयाने यापूर्वीच १९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 


हत्याकांडातील मुख्य आरोपी गुंजाळ याच्यासह आमदार जगताप व इतर आरोपींची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्याचे कारण, कट कुठे व कोणी रचला, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे मिळावीत, तसेच इतर फरार आरोपींचा शोध लागेपर्यंत सर्व आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी तपासी अधिकारी पवार व सरकारी वकील देशपांडे यांनी केली. न्यायाधीशांनी पोलिसांच्या या मागणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तुम्हाला तपासासाठी आठ दिवस दिले, त्यातून काय निष्पन्न झाले, असा सवाल न्यायाधीशांनी तपासी अधिकारी पवार यांना विचारला. आरोपींची चौकशी सुरू आहे, फरार आरोपींचा शोधही सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले. गुन्ह्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. त्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची आवश्यकता आहे. आरोपी विशाल कोतकर याला आरोपींनीच फरार केले आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील देशपांडे यांनी केला. या युक्तिवादानंतर आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर, भानुदास कोतकर ऊर्फ बीएम यांना १८ एप्रिलपर्यंत व मुख्य आरोपी गंुजाळ व केदार यांना १९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.शिवसेनेचे केडगाव शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी ७ जणांना अटक केली. त्यातील मुख्य आरोपीने गुन्हाही कबूल केला, परंतु गुन्ह्याचे कारण, तसेच इतर फरार आराेपींचा शोध पोलिसांना अद्याप लागलेला नाही. गुन्ह्याचे नेमके कारण काय होते, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. 


गुंजाळला पश्चातापही नाही 
मुख्य आरोपी संदीप गुंजाळ याने दोघांची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. हत्येनंतर स्वत:हून पोलिसांसमोर हजरदेखील झाला. गंुजाळ हा केवळ गोळ्या घालून थांबला नव्हता, तर त्याने संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. गोळ्या लागल्यामुळे आधीच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांवरही गुंजाळने तीक्ष्ण हत्याराने पुन्हा पुन्हा वार केले, यावरून त्याच्या मनात किती रोष भरलेला होता, याची कल्पना येते. विशेष म्हणजे न्यायालयात सुनावणीसाठी हजर असताना त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही दिसत नाही. 


प्रत्यक्षदर्शींना पोलिसांचे आवाहन 
केडगाव दुहेरी हत्याकांडात कोणी प्रत्यक्षदर्शी असेल, तर त्यांनी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन तपासात मदत करावी. शर्मा यांच्या ८८८८३१००० या क्रमांकावर माहिती द्यावी, माहिती देणाऱ्यांचे नाव गुपीत ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिस प्रशासनाने पत्रकाद्वारे केले आहे. 


जगताप यांचे १२ दिवस कोठडीत 
केडगाव हत्याकांडप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात भादंवि कलम १२० ब अंतर्गत हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह आमदार अरुण जगताप, शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर, संदीप कोतकर यांच्या विरोधातही हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना घटनेच्या दिवशीच (७ एप्रिल) अटक करण्यात आली. त्यांना सुरूवातीला १२ एप्रिलपर्यंत, नंतर १६ एप्रिलपर्यंत व त्यानंतर सोमवारी पुन्हा १८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सुनावणी एेकण्यासाठी न्यायालयात मोठी गर्दी झाली होती.पोलिस तपासाबाबत न्यायालयाकडे तक्रार
केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या तपासाबाबत मृत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम याने न्यायालयाकडे मंगळवारी तक्रारअर्ज सादर केला. पोलिसांनी दहा दिवस उलटूनही इतर आरोपींना अटक केलेली नाही. आरोपींचे घर, पुणे येथील फ्लॅट, आयुर्वेद महाविद्यालय, तसेच वेगेवगळ्या ठिकाणी असलेल्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी अद्याप ताब्यात घेतलेले नाही. त्याचबरोबर अटकेत असलेले आमदार जगताप व इतर आरोपींना कायद्याप्रमाणे पोलिस कोठडी द्यावी, त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली, तर ते जामिनावर सुटून गुुन्ह्याच्या तपासात हस्तक्षेप करतील, असा आक्षेप या तक्रारअर्जात घेण्यात आला. न्यायालयाने हा तक्रारअर्ज दाखल करून घेतला आहे. 


अशोक लांडे खूनप्रकरणातील आरोपींची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांना न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता होती. परंतु तपासी अधिकारी व सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद, तसेच जगताप व इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळू नये, असा तक्रारअर्ज दाखल झाल्याने जगताप यांच्यासह सर्व आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली. मृत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम यांनी अॅड. जे. जी. मुसळे यांच्यामार्फत हा तक्रारअर्ज दाखल केला. अर्जात तपासाबाबत आक्षेप नोंदवण्यात आला. दहा दिवस उलटूनही जगताप यांचा कटात सहभाग असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचू शकले नाहीत. जगताप व त्यांचेे कार्यकर्ते निवडणुकीच्या वेळी केडगावात येऊन मेहुणी सुवर्णा कोतकर व कार्यकर्त्यांसह दहशत पसरवत होते. सुवर्णा कोतकर यांनादेखील आरोपी करणे आवश्यक होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व आमदार अरुण जगताप यांचे मैत्रीचे संबंध आहेत. त्यामुळे याप्रकरणी विखे हे जगताप यांना पाठिंबा देत आहेत. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे यांनीदेखील पोलिसांवर दडपण आणले. त्यामुळेच अरुण जगताप यांना अद्याप अटक झालेली नाही. शिवाजी कर्डिले हे सत्ताधारी भाजपचे आमदार आहेत. आमदार जगताप, सुवर्णा कोतकर, संदीप कोतकर, भानुदास कोतकर व शिवाजी कर्डिले यांचे कॉल रेकॉर्डींग, तसेच या सर्वांचे घर, पुणे- मुंबई येथील फ्लॅट, हॉटेल, आयुर्वेद कॉलेज येथे त्यांच्या बैठका झाल्या आहेत. तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही. कोतकर कुटुंब वसंत ठुबे यांच्या १९८६ पासून मागे लागलेले आहेत, असे अनेक आक्षेप या तक्रारअर्जात घेतले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...