आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शिर्डी -वऱ्हाडींचे सकाळपासून येणारे जथ्थेच्या जथ्थे... मिष्टान्न जेवणाच्या पंक्ती...अत्यंत सुंदर लाॅन्स... सायंकाळी शहरातून नवरदेवांची घोडे, उंट, हत्ती तसेच सजवलेल्या वाहनांतून विविध वाद्यवृंदांच्या निनादात भव्य मिरवणूक....विवाहस्थळी विविध मान्यवरांसह ग्रामस्थांची गर्दी... आणि आतषबाजी अशा शाही थाटात विश्वाला ‘सबका मलिक एक’ हा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या पुण्यनगरीत श्री साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट, धर्मादाय आयुक्त अहमदनगर, संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज ट्रस्ट कोपरगाव व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षय्य तृतीयेच्या गोरज मुहूर्तावर अवघ्या सव्वा रुपयात ५१ वधू-वरांचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात झाला. प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते आणि माजी नगराध्यक्षा सुमित्रा कोते यांच्या नेतृत्वाखाली सलग १७ व्या वर्षी सामुदायिक विवाह सोहळा झाला.
सोहळ्यास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धर्मादाय आयुक्त शिवकुमार दिघे, धर्मादाय उपायुक्त भरत व्यास, आमदार भाऊसाहेब कांबळे, संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, साई निर्माणचे अध्यक्ष विजय कोते यांच्यासह विविध साधू-संत उपस्थित होते.
१६ वर्षांत १५७० जोडप्यांचा विवाह १२ आंतरजातीय, ५ बौद्ध व ३३ हिंदू असे ५१ जोडपी सोहळ्यात विवाहबद्ध झाली. सोळा वर्षांत १५७० जोडपी या सोहळ्यात विवाहबद्ध झाली. वधू-वरांना पोशाख, बूट, चप्पल, संसाराेपयोगी भांडी, मणी-मंगळसूत्र भेट देण्यात आले. ‘लेक वाचवा, लेक शिकवा’, स्त्री भ्रूणहत्या टाळा, हुंडा घेऊ नका-देऊ नका, वृक्षारोपण करा, शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, असा संदेश या वेळी देण्यात आला.
कोते कुटुंबाने घालून दिला समाजापुढे आदर्श
कैलास कोते यांनी सरकारी मदत न घेता सलग १६ वर्षे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे सातत्य ठेवले. शेतकऱ्यांनी मुलींचे विवाह सामुदायिक विवाह सोहळ्यात लावावे, कर्जबाजारीमुळे आत्महत्या करावी लागणार नाही याची काळजी घ्यावी. कोते परिवाराने मोठा आदर्श सर्वधर्मीयांना घालून दिला आहे.
- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.