आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाथर्डी- लोकनेते बाळासाहेब विखे यांनी जिल्ह्यातील सर्वच पक्षांवर दबाव ठेवत सत्ताकेंद्र स्वतः भोवती फिरते ठेवले. निष्ठावंतांना कायमस्वरुपी व्यासपीठ मिळावे, म्हणून तीस वर्षांपूर्वी त्यांनी जिल्हा विकास आघाडीची स्थापना केली. त्यांचे नातू डॉ. सुजय विखे यांनी विकास आघाडीचे पुनरज्जीवन करत जनसेवा फाउंडेशनच्या बॅनरखाली जिल्ह्यात राजकीय जाळे विणण्यास प्रारंभ केला आहे. कोरडगाव येथे विखे फाउंडेशनच्या माध्यमातून पहिले आरोग्य शिबिर आयोजित करत दिवसभर त्यांनी तालुका पिंजून काढला.
आमदार मोनिका राजळे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोरडगाव गणापासून डॉ. विखे यांनी राजकीय आरोग्य पडताळण्यास सुरूवात केली. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी उपस्थित रहात त्यांचे स्वागत केले. पाथर्डीच्या विविध चौकांसह तनपूरवाडी, वाळुंज, आगसखांड, टाकळीफाटा, कोरडगाव येथे युवक कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत व बॅँडच्या ठेक्यात विखेंचे उत्स्फूर्त स्वागत केले.
विळदघाट येथील हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार होणार असून औषधे सवलतीच्या दरात दिली जाणार आहेत. जिल्ह्यात एकूण ७५ शिबिरे घेतली जाणार आहेत. अत्यंत भव्य प्रमाणात दौऱ्याचे आयोजन होऊन रुग्णांचाही मोठा प्रतिसाद मिळाला.
कोरडगाव येथील कार्यक्रमात विखेंनी नगर दक्षिणेत फुंकलेले रणशिंग कोरडगाव पॅटर्न म्हणून आगामी काळात ओळखले जाणार आहे. उद््घाटन सोहळ्यास माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरूडे, ज्येष्ठ नेते काशिनाथ लवांडे, मोहन पालवे, कोरडगावचे सरपंच विष्णू देशमुख, नारायण काकडे, दामोदर काकडे, करंजीचे प्रकाश शेलार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे, युवक काँग्रेसचे अॅड. प्रतीक खेडकर, नासिर शेख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवशंकर राजळे, टायगर फोर्सचे तालुकाध्यक्ष भोरू म्हस्के, स्वप्नील देशमुख अादींसह विविध गावांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद््घाटन सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. विखे म्हणाले, अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीची निव्वळ घोषणा झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांचे भूमिपूजनाच्या घोषणा झाल्या. मात्र, एकही अंमलात आली नाही. कर्जमाफी हा तर मोठ्या विनोदाचा भाग झाला आहे. प्रत्येक गणात सभा घेऊन शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा आपण घेणार आहोत. जो वचननामा तुम्ही सांगता त्याची अंमलबजावणी कधी होणार, असा प्रश्न जनतेला पडला आहे.
संजय गांधी योजनेची अंमलबजावणी शून्य टक्के असून घरकुलांचे काय झाले. सर्वसामान्य जनतेला कुणी वाली आहे की नाही अशी परिस्थिती बदलण्यासाठी पक्षविरहित आघाडीच्या माध्यमातून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना व्यासपीठ मिळणार आहे.
जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सार्वजनिक कार्यासाठी आपण आगामी काळात पुढाकार घेऊ. गावागावात शाखा उघडू. युवक कार्यकर्ते गावपातळीवर काम करतील. फाउंडेशनच्या कोणत्याही शाखेला पदाधिकारी नसतील. स्थानिक लोक प्रश्नांवर आवाज उठवून त्याचा पाठपुरावा करतील. आगामी काळात जामखेडला बचत गटांचा मेळावा घेणार आहोत. तालुकानिहाय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासह विविध उपक्रम हाती घेतले जातील, असे डॉ. विखे यांनी सांगितले. प्रास्ताविक अजय रक्ताटे यांनी केले.
निवडणुकीला अजून उशीर...
आगामी काळात आपण कोणती निवडणूक लढवणार, कोणत्या पक्षात जाणार याचे मला काही देणे-घेणे नाही. त्याला अजून उशीर आहे. दर पंधरा दिवसांनी संपर्क कार्यालयात थांबून संवाद साधून कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केली जाईल, असे डॉ. विखे यांनी सांगितले.
भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत
दैत्यनांदूर येथे निंबादैत्याचे दर्शन घेऊन डॉ. विखे यांनी महापूजा केली. यावेळी ज्येष्ठ नेते रमेश दहिफळे, भाजपचे संजय कीर्तने, पागोरी पिंपळगावचे सरपंच बंडू नागरे, भाजप नेते व सरपंच संजय दहिफळे, रमेश घुले आदींनी त्यांचे स्वागत केले. लोकनेते बाळासाहेब विखे व गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना कार्यकर्त्यांनी उजाळा दिला. हा परिसर भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या पट्ट्यात विखेंचे स्वागत हा चर्चेचा विषय ठरला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.