आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - माळीवाडा परिसरातील मारुती कुरिअरच्या कार्यालयात झालेल्या बॉम्बस्फोटाने संपूर्ण शहर हादरले. पुणे येथील संजय नहार यांच्या नावाने असलेले हे पार्सल मारुती कुरिअरच्या कर्मचाऱ्याने उत्सुकतेपोटी फोडले. त्यामुळेच पुणे येथे होणारा हा बॉम्बस्फोट नगरमध्ये घडला. या घटनेने जिल्हा पोलिस प्रशासनाला कामाला लावले अाहे. बॉम्बस्फोटासारखी एवढी मोठी घटना घडूनही रात्री उशिरापर्यंत एकाही आरोपीचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. दरम्यान, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे हे रात्री उशिरापर्यंत नगरमध्ये ठाण मांडून होते.
माळीवाडा भागातील ढोरगल्ली येथील संतोष रावसाहेब शिंदे यांच्या मालकीच्या गाळ्यातील मारुती कुरिअरच्या कार्यालयात हा बॉम्बस्फोट झाला. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अश्विनी पटेकर ही कर्मचारी तेथे काम करत असताना एक अनोळखी व्यक्ती पुण्याला पार्सल पाठवण्यासाठी आला. 'एफएम रेडिओचे पार्सल आहे, ते पुणे येथे जाईल का,' अशी विचारणा पटेकर यांनी कर्मचारी संजय क्षीरसागर यांना केली. क्षीरसागर यांनी 'हो' म्हणताच पटेकर यांनी ते पार्सल स्वीकारले. रात्री क्षीरसागर पार्सलवर नाव टाकण्याचे काम करत होते, तेव्हा जांभळ्या रंगाच्या जिलेटिन पेपरमधील एक पार्सल खाली पडले. त्यातून 'टीव' असा आवाज आला. उत्सुकतेपोटी त्यांनी ते पार्सल फोडले.
त्यात एफएम रेडिओ होता, सोबत एक चिठ्ठी होती. चिठ्ठीवरील मजकूर वाचून क्षीरसागर यांची उत्सुकता अधिकच वाढली. त्यानंतर त्यांनी रेडिओ सुरू करण्यासाठी त्याची पीन प्लगमध्ये घालताच करताच मोठा स्फोट झाला. त्यात क्षीरसागर यांच्यासह संदीप भुजबळ हे दोघे गंभीर जखमी झाले. स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला.
लोकांनी घटनास्थळी धाव घेत दोघा जखमींना रुग्णालयात हलवले. तोपर्यंत स्फोट नेमका कशाचा झाला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली. बुधवारी सकाळीच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौभे यांच्यासह फॉरेन्सिक लॅबचे पथक, एटीएस (दहशतवाद विरोधी पथक), गुप्तचर विभागाने घटनास्थळाची पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती कोणतेच धागेदोरे लागले नाही. ज्या व्यक्तीने कुरिअर आणून दिले, त्याचे रेखाचित्र तयार करण्यात आले अाहे. या घटनेच्या तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. तपासासाठी आठ पथके तयार करण्यात आली असून काही पथके पुणे येथे रवाना झाली आहेत. नगरमधील नागरी वस्तीत प्रथमच असा बॉम्बस्फोट निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगर शहरात काही भागात देशविरोधी कारवायांचा नेहमीच संशय व्यक्त केला जातो. या घटनेने या संशयाला बळ मिळाले आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
संजय नहार यांच्या नावाने चिठ्ठी
'संजय सर, मै नगमा शेख मेरा सलाम कबुल किजीये। मै आपके सरहद कॉलेज में पढी हूं। आपने मुझे कॉलेज के वक्त पैसोंका, रहनेका इन्तजाम िकया था। मै आपकी बहुत रहेनुमा हूं। आपके लिये मैने एक तोहफा भेजा है। मैने मेरी आवाज रेकॉर्डिंग की है। आप जरूर सुनिये सर। मुझे अच्छा लगेगा। अल्ला से दुअा करती हूं, की आपकी हर ख्वाइश पुरी हो। संजय सर खुदा हाफीज,' असा मजकुर असलेली चिठ्ठी कुरिअरमध्ये होती. 'इसमे बॅटरी नही है, इसको चार्जिंग लगा के सुनो,' असेही रेडिओच्या पाठीमागे लिहिलेले होते.
घटनेच्या सर्व बाजू तपासणार : चौबे
हा स्फोट क्रूड बॉम्बचा असून तो हाताने बनवलेला होता. तो रेडिओमध्ये एका पाइपमध्ये बसवण्यात आला होता. हे पार्सल पुण्याला पाठवले जाणार होते. कुरिअर कर्मचारी संजय क्षीरसागर यांनी हे पार्सल उघडून पाहिले असता त्यात एक रेडिओ होता. या रेडिओचे बटन आॅन करताच स्फोट झाला. कुरिअर कार्यालयात पार्सल आणून देणाऱ्याचे रेखाचित्र तयार करण्यात आले असून घटनेचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येणार असल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी सांगितले.
ओळखपत्राची प्रत सक्तीची हवी
शहरात अनेक कुरिअर कंपन्या आहेत. तेथून दररोज हजारो पार्सलची देवाण-घेवाण होते. ऑनलाईन खरेदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे कुरिअरकडे संशयाने पाहिले जात नाही. कुणी सहजपणे कुरिअर पाठवू शकतो. परंतु कुरिअर कंपन्यांनी पार्सल स्वीकारताना संबंधित व्यक्तीच्या ओळखपत्राची प्रत घेणे आवश्यक आहे. ओळखपत्राची ही प्रत सक्तीची केल्यास माळीवाडा बॉम्बस्फोटासारखे प्रकार होणार नाहीत. झालेच तर त्यांचा तपास करणे पोलिसांना सोपे होईल.
पुढील स्लाइडवर, तपासाचे पोलिसांपुढे मोठे आव्हान...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.