आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यश्लोक अहल्यादेवी जयंतीच्या तयारीला चोंडीत वेग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड- पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंतीसाठी त्यांचे जन्मगाव चोंडी सज्ज झाले आहे. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने गुरुवारी (३१ मे) सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य व माजी मंत्री आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार छत्रपती संभाजीराजे, माजी मंत्री अण्णा डांगे, आनंदराव देवकाते, खासदार डाॅ. विकास महात्मे, आमदार रामहरी रूपनवर, आमदार रामराव वडकुते, आमदार अनिल गोटे, दत्तात्रय भरणे, नारायण पाटील, प्रसिध्द कवी ना. धों. महानोर आदी उपस्थित राहणार आहेत. 


जयंती महोत्सवासाठी तब्बल पाचशे फूट गुणिले एक हजार फूट लांबी-रूंदीचा मंडप उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण मंडप वाॅटरफ्रूप असणार आहे. त्यामध्ये पन्नास गुणिले वीस फुटांचे भव्य व्यासपीठ आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी सोमवारी चोंडीतील कार्यक्रम स्थळाची पाहणी करत कार्यक्रमाची आढावा बैठक अधिकाऱ्यांसमवेत घेतली. अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, उपअधीक्षक सुदर्शन मुंढे, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, कार्यकारी अभियंता तडवी, सहायक पोलिस निरीक्षक नितीन पगार, तहसीलदार विजय भंडारी आदी उपस्थित होते. 


चोंडीतील अधिकृत हेलिपॅडचे होणार उद््घाटन 
पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकरांचे जन्मगाव म्हणून चोंडीत विविध कार्यक्रमानिमित्त अनेक मान्यवरांचे येणे-जाणे कायमच चालू असते. यातील बहुतांश मान्यवर हेलिकाॅप्टरनेच येत असतात. त्यामुळे चोंडीत प्रत्येकवेळी हेलिपॅड बनवण्याचा ताण प्रशासनावर येतो. या पार्श्वभूमीवर चोंडीत कायमस्वरूपी हेलिपॅड बनवण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी प्रशासनाने घेतला. या हेलिपॅडचे बांधकाम पूर्ण झाले आहे. गुरुवारी (३१ मे) लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन या हेलिकाॅप्टरनेच येणार असून, त्यांच्याच हस्ते या हेलिपॅडचे उद््घाटन होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...