आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परमवीर चक्र विजेत्यांची चित्रमय शौर्यगाथा सांगत राष्ट्रभक्तीचा जागर...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- पार्वतीबाई डहाणूकर कन्या विद्यालयातील कलाशिक्षक वृषाल दत्तात्रेय एकबोटे यांचा चित्र-संगीताचा अनोखा उपक्रम 

- १९४७ ते १९९९ पर्यंत देशातील एकूण २१ जणांना परमवीर चक्र मिळालेल्या शूरवीरांची चित्रे वृषाल यांनी रेखाटली जलरंगात. 


नगर- शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, 'तुमचा आवडता नायक कोण?' कुणी सांगितलं सलमान खान, कुणी म्हणालं शाहरूख खान. देशाचे खरे नायक असलेल्या एकाही क्रांतिकारकाचं नाव मुलांना सांगता आलं नाही. विद्यार्थ्यांना वीरपुरुषांची माहितीच नाही, हे लक्षात आल्यानंतर त्या शिक्षकाने एक अभियान हाती घेतलं. ते शिक्षक म्हणजे नगरच्या पार्वतीबाई डहाणूकर कन्या विद्यालयातील कलाशिक्षक वृषाल दत्तात्रेय एकबोटे. 


देशाच्या रक्षणासाठी शत्रूशी लढताना सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या परमवीर चक्र विजेत्यांचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी एकबोटे यांनी आपल्या चित्रकला आणि संगीतकलेचा आधार घेतला. मुलांपुढे केवळ व्याख्यान देण्याऐवजी चित्रमय विश्वात नेऊन त्यांनी आपल्या शूर जवानांच्या कर्तृत्वाची ओळख करून देण्यासाठी त्यांनी परमवीर चक्र मिळालेल्या सर्वांची चित्रे रंगवली. २६ जानेवारी २०१८ पासून त्यांनी प्रदर्शन भरवण्याचा उपक्रम सुरू केला. 
वृषाल यांचे वडील दत्तात्रेय एकबोटे हे भारतीय वायुसेनेतील निवृत्त कारपोरल आहेत. आजोबाही सैन्यदलात होते. त्यामुळे त्यांना लष्कराची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. खरंतर वृषाल यांनाही लष्करात भरती व्हायचं होतं, पण उंची कमी पडल्याने त्यांना ती संधी मिळाली नाही. तथापि, एनसीसीचे ते छात्र असल्याने त्या ज्ञानाचा उपयोग झाला. 


१९४७ ते १९९९ पर्यंत एकूण २१ जणांना परमवीर चक्र मिळालं आहे. या शूरवीरांची २० गुणिले २७ इंच या आकारातील चित्रे वृषाल यांनी जलरंगात रेखाटली. या चित्रांचे प्रदर्शन ते विविध शाळांमध्ये भरवतात. वीरांची माहिती सांगणारी भित्तीचित्रेही त्यांनी तयार केली आहेत. या चित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे जरा बारकाईनं पाहिलं, तर प्रत्येक परमीवर चक्र विजेत्याच्या डोळ्यातील बुबुळात 'जय हिंद' हे शब्द दिसतात. प्रदर्शनाच्या वेळी वृषाल स्वत: परमवीर चक्र विजेत्यांच्या शौर्यगाथा सांगतात. माहितीच्या जोडीला ते राष्ट्रभक्तीपर गाणी सादर करतात. सारे जहाँ से अच्छा.., ए वतन ए वतन..., हर करम अपना करेंगे ए वतन... , किसीकी मुस्कराहटोंपे हो निसार...ही देशभक्तीने ओथंबलेली गाणी ऐकताना प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. प्रत्येक जण राष्ट्रभावनेने प्रेरित होतो. ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं, त्यांच्याविषयी कृतार्थ भाव हे प्रदर्शन पाहताना मनात जागा झाल्याशिवाय रहात नाही. 


मोबाइलवर स्टीकर 
हल्ली प्रत्येकाकडे मोबाइल असतो. मोबाइलवर बोलतानाही राष्ट्रप्रेम जागवण्यासाठी वृषाल एकबोटे यांनी परमवीर चक्र विजेत्यांच्या चित्रांचे लहान स्टीकर तयार केले आहे. हे प्रदर्शन पहायला येणाऱ्यांना एकबोटे ही स्टीकर विनामूल्य देतात. मोबाइलच्या मागील बाजूस ही स्टीकर चिकटवणाऱ्यांची संख्या आता एक हजारांच्या पुढे गेली आहे. 

बातम्या आणखी आहेत...