आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये कुरियर ऑफिसात पार्सल उघडून रेडिओ लावताच बॉम्बस्फोट; दाेघे गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहरात माळीवाडा परिसरातील कौठीची तालीम परिसर मंगळवारी रात्री हादरला. येथील ‘मारुती कुरियर’च्या कार्यालयात रात्री दहाच्या सुमारास एका पार्सलमध्ये आलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्याने कुरियरचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले. दरम्यान, हा स्फोट क्रूड बॉम्बचा (हाताने बनवलेला बॉम्ब) असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बॉम्ब असलेले पार्सल पुणे येथील सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांच्या नावाने पाठवण्यात आले होते. नहार यांनी चालवलेल्या चळवळीला विरोध करणाऱ्या कट्टरवादी संघटनांनीच हे पार्सल पाठवले असल्याचा संशय पोलिस सूत्रांनी व्यक्त केला. त्याच दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संदीप बाबूराव भुजबळ (४०) व संजय क्षीरसागर (२७) अशी जखमींची नावे आहेत.


पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक पोलिस अधीक्षक डाॅ. अक्षय शिंदे यांच्यासह  बॉम्बनाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. हा स्फोट क्रुड बॉम्बचा असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. दरम्यान, एटीएस, नाशिक येथील न्यायवैद्यक फिरती प्रयोगशाळा व गुप्तचर विभागाचे पथक शहरात दाखल झाले. घटनेच्या तपासासाठी आठ पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. त्याचबरोबर कुरियर घेऊन आलेल्या व्यक्तीचे रेखाचित्रदेखील तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कटासाठी शहरातील सीसीटीव्ही नसलेल्या भागाची निवड करण्यात आली होती. 

 

अनोळखी व्यक्तीने दिले पार्सल...सोबत होते महिलेच्या नावाने लिहिलेले पत्र

मंगळवारी दुपारी ३.३० वाजता एक अनोळखी व्यक्ती मारुती कुरियर कार्यालयात पार्सल देऊन गेली. कार्यालयातील एका मुलीने ते घेतले. तिचे काम संपल्यानंतर ती निघून गेली. रात्री संदीप व संजय हे कर्मचारी कुरियरचे पत्ते व इतर बाबी तपासत होते. रात्री पावणेदहाच्या सुमारास एका कुरिअरमधून काहीतरी आवाज आला. त्यामुळे सतीश यांनी पार्सल उघडले. त्यात रेडिओ होता, त्यांनी रेडिओ सुरू करताच स्फोट झाला. त्याचा आवाज इतका मोठा होता की संपूर्ण परिसर हादरला. हे पार्सल देणाऱ्या व्यक्तीचे रेखाचित्र तपास पथकांनी तयार करून त्याचा शोध सुरू केला आहे.

 

पार्सलवर अहमदनगर येथील पत्ता बनावट
ज्या पार्सलचा स्फोट झाला, त्यावर ‘सरहद कॉलेज, राजाराम गॅस एजन्सीच्या समोर, भारती विद्यापीठाच्या मागे, कात्रज, पुणे, संजय नहार सर’ असा पत्ता लिहिलेला होता. अहमदनगरमधील मिश्किन मळा रस्त्यावरील कृपाल बाग परिसरातील नगमा शेख हिने हे कुरियर पाठवले होते. परंतु नगमा हिचे नाव व पत्ता बनावट असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. कुरियरवरील नगमा हिचा फोन नंबरदेखील बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

लोखंडी पाइपमध्ये स्फोटके भरून तयार केला बॉम्ब
या स्फोटात वापरलेला क्रूड बॉम्ब एका लोखंडी पाइपमध्ये स्फोटके भरून व त्याला डिटोनेटर लावून तयार करण्यात आला होता. नंतर तो रेडिओसारख्या दिसणाऱ्या उपकरणात बसवण्यात आला होता. त्यात वापरण्यात आलेल्या स्फोटकांचे नमुने फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घेतले आहेत. क्रूड बाॅम्ब तसा कमी क्षमतेचा असतो. त्यात वापरण्यात येणारी स्फोटकेही कमी दर्जाची असतात, अशी माहिती पोलिसांतील तज्ज्ञ सूत्रांनी दिली.

 

‘सरहद’ संस्थेद्वारे काश्मिरात शांततेसाठी सामाजिक काम करतात संजय नहार

मूळ नगर जिल्ह्याचे असलेले संजय नहार हे ‘सरहद’ संस्थेच्या माध्यमातून जम्मू-काश्मिरात शांततेसाठी सामाजिक काम करतात. १९९० च्या दशकात काश्मिरात अतिरेकी कारवाया वाढल्यानंतर त्यांनी येथे कामास सुरुवात केली.  पंजाब, जम्मू-काश्मीर, ईशान्य भारतातील मुलांना त्यांनी पुण्यात शिक्षणाची साेय उपलब्ध करून दिली. ‘भारताची अाेळख’ या उपक्रमातून त्यांनी या मुलांना देशातील विविध शहरांत फिरवले. १९८३ मध्ये ब्ल्यू स्टार प्रकरणानंतर त्यांनी शांततेसाठी काम केले हाेते.

 

नहार यांच्या नावे चिठ्ठी 
‘संजय सर, मै नगमा शेख मेरा सलाम कबुल किजीये। मै आपके सरहद कॉलेज में पढी हूं। आपने मुझे कॉलेज के वक्त पैसोंका, रहनेका इन्तजाम िकया था। मै आपकी रहेनुमा हूं। आपके लिये मैने एक तोहफा भेजा है। मैने मेरी आवाज रेकॉर्डिंग की है। आप जरूर सुनिये सर। मुझे अच्छा लगेगा। अल्ला से दुअा करती हूं, की आपकी हर ख्वाइश पुरी हो।’ अशी चिठ्ठी कुरियरमध्ये होती. ‘इसमे बॅटरी नही है, इसको चार्जिंग लगा के सुनो,’ असेही रेडिओच्या पाठीमागे लिहिलेले होते.

 

हेही वाचा..

अहमदनगरात कुरिअर पार्सलचा स्फोट; वाचा कोण आहेत संजय नहार?

कर्मचाऱ्याने उत्सुकतेपोटी पार्सल फोडल्यानेच स्फोट, रात्री उशिरापर्यंत एकाही आरोपीचे धागेदोरे हाती नाहीत

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...