आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जिल्ह्यातील ३८३ प्राथमिक शिक्षक प्रशासनाच्या रडारवर; द्यावे लागणार जास्तीचे पुरावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळकी- प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याप्रकरण बदल्या होण्याअगोदर तेवढे गाजले तेवढेच बदल्या झाल्यानंतरही गाजत आहे. बदल्यांसाठी अनेक शिक्षकांनी चुकीची माहिती भरत बदल्या करून घेतल्याचा आरोप विस्थापितांसह इतर शिक्षकांनी केला. पुराव्यांनिशी अनेकांचे पितळ उघडे पाडले. परिणामी संवर्ग १ आणि संवर्ग २ मधील शिक्षकांच्या बदली अर्जांच्या फेरतपासणीचे आदेश प्रशासनाला द्यावे लागले. प्रशासनाने केलेल्या या फेर तपासणीत संवर्ग १ मधील २२५ शिक्षक आणि संवर्ग २ मधील १५८ असे ३८३ शिक्षक संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. प्रशासनाच्या रडारवर असणाऱ्या या ३८३ शिक्षकांना वाढीव पुरावे देऊन आपले प्रामाणित्व सिद्ध करावे लागणार आहे. 
 
शासनाच्या नवीन बदली धोरणानुसार ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया नुकतीच पार पडली. यात नगर जिल्ह्यात ५ हजार ४३९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. अपेक्षित २० पैकी एकही गाव न मिळाल्याने जिल्ह्यातील ६२६ शिक्षक विस्थापित झाले. या विस्तापित शिक्षकांनी आक्रमक धोरण घेत बदली प्रक्रियेत चुकीची माहिती भरत बदली पदरात पाडून घेतलेल्या शिक्षकांच्या विरोधात पुराव्यानिशी तब्बल ४८० तक्रारी जिल्हा परिषदेकडे केल्या. जिल्हा परिषदेनेही या तक्रारी एनआयसीकडे पाठवल्या. त्यानुसार राज्य शासनाच्या शिक्षक विभागाने शिक्षक बदली अर्जांची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षक विभागाने केलेल्या तपासणीनुसार जिल्ह्यातील ३८३ शिक्षक संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. जिल्ह्यातील १ हजार १७२ शिक्षकांनी संवर्ग १ चा लाभ घेतला आहे. त्यातील ५६० शिक्षकांनी योग्य ते सर्व पुरावे जोडून बदली करून घेतली आहे, तर ३८७ शिक्षकांनी योग्य पुरावे जोडत बदलीस नकार कळवला होता. या शिवाय १२३ शिक्षकांनी अपूर्ण किंवा संशयित पुराव्यांच्या आधारे बदलीचा लाभ घेतला, तर १०२ शिक्षकांनी अपूर्ण किंवा संशयित पुराव्यांच्या आधारे बदलीस नकार देत संवर्ग १ चा लाभ घेतला आहे. अशा २२५ शिक्षकांना आता आपले प्रमाणित्व सिद्ध करण्यासाठी जास्तीचे पुरावे सादर करावे लागणार आहेत. संवर्ग १ मधीलच अपंग प्रमाणपत्राचा वापर बदलीसाठी, तसेच बदली नकारासाठी केलेल्या शिक्षकांची संख्या ४३४ आहे. त्यातील ३०२ शिक्षकांनी नियमानुसार २०११ नंतरचे प्रमाणपत्र योग्य त्या विहीत नमुन्यात सादर केलेले आहे, तर १३२ शिक्षकांना २०११ नंतरचे विहीत नमुन्यातील अपंग प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना आता ते नव्याने सादर करावे लागणार आहे. मेंदू विकार, हृदयरोग यांसारख्या आजारांची प्रमाणपत्रे प्रशासन सक्षम तज्ज्ञांकडून तपासून खात्री करून घेणार आहेत. घटस्फोटित, विधवा, मतिमंद पालकत्वाबाबतही प्रशासन जास्तीचे पुरावे मागून घेणार आहेत. 
 
संवर्ग २ मधील एकूण बदली झालेल्या शिक्षकांची संख्या ६२६ आहे. त्यातील ४७८ शिक्षकांनी योग्य ते सर्व पुरावे जोडलेले आहेत, तर १५८ शिक्षकांनी अपूर्ण अथवा संशयित पुराव्यांच्या आधारे बदलीचा लाभ घेतला आहे. या १५८ शिक्षकांना नव्याने जास्तीचे पुरावे सादर करावे लागणार आहेत. यात पती-पत्नी सेवेत असल्याबाबत त्यांची मान्यता प्रत, सेवा पुस्तक, वेतन खात्यात जमा होत असल्याचे पुरावे, अंतराच्या बाबतीत गुगल मॅप, तसेच प्रत्यक्ष वाहनाच्या प्रवासानुसारचे मिटर रिडिंगनुसार अंतर यातील सारखेपणा याबाबत पुरावे द्यावे लागणार आहेत. 
 
संवर्ग १ आणि संवर्ग २ चे मिळून प्रशासनाच्या रडारवर असणाऱ्या या ५१५ शिक्षकांना प्रमाणित्व सिद्ध करण्यासाठी जास्तीचे पुरावे द्यावे लागणार आहेत, जर योग्य पुरावे दिल्यास ते पात्र ठरतील. पुरावे देऊ न शकल्यास अपात्र होणाऱ्या शिक्षकांना बदली रद्द होऊन दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल. ८ शिक्षक जिल्हा बदली होऊन आलेले असताना आणि त्यांची सेवाज्येष्ठता बदलीसाठी पात्र नसतानाही त्यांनी बदलीसाठी अर्ज करून बदलीचा लाभ घेतला आहे. त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते. 
 
पुरावे न दिल्यास अपात्र ठरणार 
अपूर्ण पुराव्यांच्या आधारे संवर्ग १ व संवर्ग २ मधील लाभधारक शिक्षकांना त्यांचे प्रमाणित्व सिद्ध करण्यासाठी जास्तीचे पुरावे देण्याबाबत सांगितले जाणार आहे. अंतराबाबतचे खरेपणा सिद्ध करून दाखवावा लागणार आहे, जर योग्य ते पुरावे देऊ केले, तर ते शिक्षक घेतलेल्या लाभास पात्र ठरतील; अन्यथा अपात्र ठरतील.
- रमाकांत काटमोरे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद. 

 

बातम्या आणखी आहेत...