Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | shripad chindam come to ahmadnagar municipalty general meeting

बंदोबस्ताचे ४ हजार भरून छिंदम महापालिकेत! अवघ्या दीड मिनिटात तो परतला...

प्रतिनिधी | Update - Aug 03, 2018, 11:09 AM IST

अवघ्या दीड मिनिटात निवेदन देऊन छिंदम सभागृहाबाहेर पडला.

 • shripad chindam come to ahmadnagar municipalty general meeting

  नगर- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या श्रीपाद छिंदमने पोलिस बंदोबस्तासाठी ४ हजार १७४ रुपयांचे शुल्क भरले होते. त्याने पोलिस बंदोबस्तात महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी हजेरी लावली. अवघ्या दीड मिनिटात निवेदन देऊन छिंदम सभागृहाबाहेर पडला. त्याचे निवेदन स्वीकारल्याच्या कारणावरून नगरसेवकांनी महापौरांवर टीका करत 'वॉक आऊट'चा इशारा दिला. सभागृहात गोंधळ निर्माण झाल्यामुळे महापौरांनी सभा तहकूब करून शुक्रवारी घेण्याचे आदेश दिले.


  माजी उपमहापाैर श्रीपाद छिंदमने काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बेताल वक्तव्य केल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. छिंदमने उपमहापौर पदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्याने उपमहापौर निवडण्यात अाले. तथापि, आजतागायत छिंदमविरोधी रोष अजूनही शांत झाला नसल्याचे गुरुवारी समोर आले.


  महासभेला उपस्थित राहण्यासाठी बंदोबस्त मिळावा, यासाठी छिंदमने पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना आठ दिवसांपूर्वीच पत्र दिले होते. पोलिस प्रशासनाने छिंदमला सशुल्क बंदोबस्त उपलब्ध करून दिला. यापोटी छिंदमने ४ हजार १७४ रुपये पोलिस प्रशासनाला अदा केले होते. त्यानुसार दोन स्टेनगनधारी पोलिस संरक्षण दिले गेले. मनपातही कायदा सुव्यवस्थेचा विचार करून मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आला होता. महापौर सुरेखा कदम यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी एक वाजता महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला छिंदम हजेरी लावणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची जाणीव ठेवून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनपाच्या दोन्ही प्रवेशद्वारांसमोर पोलिस तसेच प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींची मोठी गर्दी होती. सभेपूर्वी मनपाच्या आवारात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी छिंदमच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून निदर्शने केल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करत १० जणांना ताब्यात घेतले.


  मनपा आवारात नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसेच प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींव्यतिरिक्त कोणालाही थांबू दिले जात नव्हते. दुपारी दीडच्या सुमारास छिंदमने पोलिस बंदोबस्तात महापालिकेत हजेरी लावली. सभा सुरू असताना छिंदमचे आगमन झाल्यानंतर सभेत गोंधळ निर्माण झाला. नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. छिंदमने हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करून सभेतील इतिवृत्त कायम करण्याच्या विषयाच्या आक्षेपाबाबतचे निवेदन महापौरांना दिले. त्यानंतर छिंदम लगेच सभागृहाबाहेर निघून गेला. छिंदमच्या आगमनामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सभा तहकूब करण्याची मागणी केली. कवडे यांनी गोमूत्र फेकून सभागृह शुद्ध करा, अशी मागणी केली. नगरसेवक अनिल शिंदे म्हणाले, महापौरांनी निवेदन स्वीकारण्याऐवजी त्याच्या अंगावर का फेकले नाही? असा सवाल उपस्थित केला. अॅड. आगरकर म्हणाले, सभागृहाचे काही अलिखित संकेत असतात, छिंदमला रजेचा अर्ज देण्याचा अधिकार असतो, त्यानुसार तो अर्ज त्याने महापौरांना दिल्याचे सांगितले. कवडे यांनी सभा रद्द करण्यास विरोध केला. तथापि गोंधळ सुरूच राहिल्याने महापौरांनी सभा तहकूब करून शुक्रवारी (३ ऑगस्ट) घेण्याचे आदेश दिले.


  गिरवलेंच्या आठवणी
  सभागृहात दुखावट्याचा विषय प्रथम घेण्याची मागणी नगरसेवकांनी केली. त्यानुसार दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांना सभागृहात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्या वेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी गिरवले यांच्या सभागृहातील तसेच मैत्रीपूर्ण संबंधाबाबतच्या आठवणींना उजाळा दिला.


  महापौर रडकुंडीला
  छिंदमचे निवेदन स्वीकारल्यानंतर महापौरांवर नगरसेवकांनी जोरदार टीका केली. त्या वेळी महापौर कदम संतापून म्हणाल्या, छिंदम आला, तेव्हा सर्वांनी बोलायला हवे होते. परंतु, त्या वेळी कोणीच संभाषण केले नाही. तो गेल्यानंतर मी स्त्री असल्याने आरोप करता, असे म्हणत त्यांचे डोळे पाणावले.


  असा पोहोचला छिंदम
  श्रीपाद छिंदम येणार असल्याने त्याच्या निषेध करणाऱ्यांची संख्याच मनपा आवारात अधिक होती. दुपारी दीडच्या सुमारास छिंदमने पोलिस बंदोबस्तात मनपात हजेरी लावली. सभागृहातील मागील बाजूच्या दरवाजातून थेट व्यासपीठावरच छिंदम हजर झाला. तेथेच त्याने हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी केली.


  स्वाक्षरी 'रद्द'ची मागणी
  सभेला हजर नगरसेवकांनी रजिस्टरला स्वाक्षऱ्या केल्या होत्या. पण नंतर श्रीपाद िंछंदमची स्वाक्षरी त्याच रजिस्टरला झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला. छिंदमची स्वाक्षरी असलेल्या सभेला आमची स्वाक्षरी नको, ती रद्द करा, अशी मागणी नगरसेवक संजय घुले यांच्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केली.


  'सील'प्रकरणी निषेध
  जागा मालकाला नोटीस न देता भाजपचे गांधी मैदान येथील कार्यालय 'सील' केल्याप्रकरणी नगरसेवक किशोर डागवाले यांनी अधिकाऱ्यांचा धिक्कार केला. त्यावर प्रशासनाने दरवाजाला नोटीस चिकटवल्याचे स्पष्ट केले. त्यावर पंचनामा विचारला असता अधिकारी निरुत्तर झाले.


  छिंदमने दिला महापौरांना कारवाईचा इशारा
  गरसेवकपद रद्द करण्याच्या ठरावाचे इतिवृत्त कायम करू नये, अन्यथा पदाचा व सत्तेचा गैरवापर करून बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा श्रीपाद छिंदमने महापौरांना सभागृहात दिलेल्या निवेदनाद्वारे दिला. विशेष म्हणजे या निवेदनावर छिंदमने उपमहापौरपद लावून स्वाक्षरी केल्यामुळे संभ्रम वाढला आहे.


  छिंदमने निवेदनात म्हटले आहे की, महापौर सुरेखा कदम, त्यांचे पती संभाजी कदम तसेच तत्कालीन आयुक्त घनश्याम मंगळे यांच्याविरुद्ध १३ जुलैला तोफखाना पोलिसांत तक्रार केली आहे. उपमहापौरपदाचा बनावट राजीनामा तयार केल्याप्रकरणी छिंदमने ही फिर्याद तोफखाना पोलिसांत दिली आहे. नगरसेवक पद रद्दबातल करण्याबाबत नगरविकास खात्याने पत्र देऊन विचारणा केली आहे. त्यावर दिलेल्या उत्तरात महापौर कदम व संभाजी कदम यांनी हे बेकायदेशीर कृत्य केल्याचे नमूद केले आहे. माझे नगरसेवक रद्द करण्याबाबतचे इतिवृत्त मंजूर करू नये, अन्यथा पदाचा व सत्तेचा गैरवापर करून बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यास भाग पडेल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शुक्रवारी सभेच्या उर्वरित कामकाजात छिंदमचा आक्षेप नोंदवून इितवृत्त मंजूर होणार का? याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.

 • shripad chindam come to ahmadnagar municipalty general meeting

  श्रीपाद छिंदमच्‍या हजेरीमुळे महापालिका परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून येथे मोठा पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे.
   

 • shripad chindam come to ahmadnagar municipalty general meeting

  छिंदमला कडक बंदोबस्‍तात महापालिकेत आणण्‍यात आले होते.

Trending